scorecardresearch

चंद्रपूरमधील भारतीय स्टेट बँकेची बनावट आयकर कागदपत्रांद्वारे १४ कोटी २६ लाखांची फसवणूक!

१२ कर्जधारक, १ एजंट व व्यवस्थापकासह ३ बँक अधिकाऱ्यांना अटक ; मुंबईतील बँकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी पथक रवाना

(प्रतिनिधिक छायाचित्र)

भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी, बिल्डर व एजंट यांनी संगनमत करून अधिकचे गृहकर्ज मिळावे यासाठी, ४४ जणांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून अधिकचे कर्ज वितरीत करून स्टेट बँक ऑफ इंडियाची १४ कोटी २६ लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यामध्ये स्टेंट बँकेचे दोन व्यवस्थापक, कर्मचारी, एजंट तथा कर्जदार यांचा समावेश आहे. याप्रकरणात शहरातील नामांकित बिल्डरांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे बिल्डर लॉबीत खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग अरूणकुमार भागवतकर यांनी सांगितले की, ४४ कर्जधारकांनी गृह कर्ज घेण्यासाठी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत अर्ज सादर केले. सदर प्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मुल्याकंनापेक्षा अधिकच्या कर्ज रकमेचे वाटप झाले. कर्ज वाटपानंतरच्या तपासणीमध्ये बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकेची एकूण १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रूपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामनगरप पोलिसांत तक्रार देण्यात आली. तर, तक्रारीच्या अनुषंगाने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, बनावट आयकर रिटर्न सादर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी बँकेचे बापट नगर शाखेचे एटीएम व्यवस्थापक पंकजसिंग किशोरसिंग सोळंकी, कवठाळा बँकेचे व्यवस्थापक विनोद केशवराव लाटेलवार, देविदास श्रीनिवासराव कुळकर्णी, अकोला, या तीन बँक कर्मचाऱ्यासह १ एजंट, १२ कर्जधारकांना अटक केली आहे. तर, बँकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी पथक मुंबईत गेले असून, एका अधिकाऱ्यास नागपुरात अटक केली जाणार आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास रामनगर आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. याप्रकरणात डीएसके ग्रीन बिल्डर यांच्यासह शहरातील नामांकित बिल्डरांची नावे समोर येत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मस्के अधिक तपास करित आहेत.

अटक केलेले कर्जधारक –

श्वेता महेश रामटेके (वय -४२, रा.बाबुपेठ, व्यवसाय मजूरी) वंदना विजयकुमार बोरकर (वय – ४० रा.नगिनाबाग,मजूरी) योजना शरद तिरणकर (वय -४२ डीएसके ग्रीन डुप्लेक्स, म्हाडा कॉलनी), शालिनी मनिष रामटेके (वय-४५, रा. भद्रावती), मनिषा विशाल बोरकर(वय- ४०, रा. भद्रावती), वृंदा कवडू आत्राम (वय- ४९, डीएसके कॉलनी, बोर्डा, वरोरा), राहुल विनय रॉय (वय- ३६ रा. माजरी), गजानन दिवाकर बंडावार (वय-३९ रा.धाबा), राकेशकुमार रामकिरण सिंग वय- ४२ ,सास्ती, राजुरा), गणेश देवराव नैतमा (वय- ३६ रा. कोसारा), गिता गंगादिन जागेट (वय-५३ रा.वेकोली घुग्घुस) यांचा समावेश आहे.

दोन वर्षापूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे केली होती राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी तक्रार –

राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी स्टेट बँकेच्या घोटाळ्याचे हे प्रकरण ४ जानेवारी २०२० मध्ये उघडकीस आणले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेवून व्यवस्थापकासह बिल्डरवर काराईची मागणी केली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एका एजंटच्या मदतीने ७० ते ८० कोटीचे कर्ज कमिशनच्या स्वार्थापोटी बिल्डरांशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने वितरीत केले होते. तेव्हा बँकेचे अनेक खाते एनपीए (नॉन फर्मिंग अकाउंट )मध्ये गेले. त्यामुळे एसबीआयला मोठा आर्थिक फटका बसला. आर्थिक परिस्थिती नुसार १० ते १५ लाख रुपयांचे कर्ज मिळायला हवे अशा व्यक्तींना ३० ते ४० लाखाचे कर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे दिले गेले. या घोटाळ्याची तक्रार राजीव कक्कड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे केली होती. तसेच, सीबीआय व आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी अशीही मागणी लावून धरली होती. मात्र तेव्हा कक्कड यांना एका बिल्डरने प्रकरण लावून धरून नका, अन्यथा पाच कोटींचा मानहानीचा दावा करू अशी धमकी दिली होती. मात्र आता आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणात १६ जणांना अटक केल्याने बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud of 14 crore 26 lakhs through fake income tax documents of state bank of india at chandrapur msr

ताज्या बातम्या