सांगली : फोटो व घामाचे कपडे घेउन करणी करून जिवीताला धोका पोहचविण्याचा प्रयत्न एका मांत्रिकाने केला असल्याची तक्रार एका लॉण्ड्री व्यावसायिकांने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत माहिती अशी, श्रीप्रसाद राक्षे (वय ३५ रा.तासगाव) यांची पत्नी अस्मिता ही हातकणंगले येथे वास्तव्यास आहे. ती सुभाषनगर (ता.मिरज) येथील मांत्रिक सलीम मुल्ला याच्या संपर्कामध्ये आली.

यावेळी मांत्रिकाने  २२  मार्च ते ३० मे  २०२२  या दरम्यान, पत्नीकडून घरातील व्यक्तींचे फोटो व घामाने भिजलेले कपडे, पायमोजे, रूमाल याची मागणी केली. पत्नीला अंगारा देउन याद्बारे आपण करणी, भानामती करून सासरच्या मंडळींना योग्य मार्गावर आणू शकतो असा विश्‍वास दिला. यासाठी त्यांने श्रीप्रसाद राक्षे यांच्या पत्नीकडून  ५०  हजार रूपयेही उकळले आहेत.या प्रकरणी मांत्रिक मुल्ला याच्याविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.