नगर रेल्वेस्थानकातील मालधक्क्यातून परतणाऱ्या मालगाडीच्या एका डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने अनेक प्रवासी गाडय़ांचा खोळंबा होऊन प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. पहाटे पावणेतीनच्या सुमारास माल उतरवून मालगाडी स्थानकात येत होती. तिच्या १४ व्या क्रमांकाच्या डब्याचे चाक रुळावरून घसरले. त्यामुळे सर्वच गाडय़ांना विशेषत: दौंडहून येणाऱ्या अन्य लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वेगाडय़ांना प्रचंड उशीर झाला. पहाटे तीन वाजता येणारी पाटना एक्सप्रेस सकाळी सहा वाजता आली. महाराष्ट्र, गोवा, नागपूर अशा सर्वच एक्सप्रेसला विलंब झाला. दौंडहून पहाटे पाच वाजता आलेल्या क्रेनच्या साहाय्याने घसरलेला डबा बाजूला करण्यास सकाळचे सहा वाजले. परंतु सायंकाळपर्यंत रेल्वे विलंबानेच धावत होत्या.