शहरातील स्टेशन रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी तीन नवे प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हय़ाचे संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि. ५) मुंबईत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत बैठक बोलावण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या वादावर तातडीने पडदा टाकून यातून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दुपारी झालेल्या बैठकांनंतर शिंदे पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, खासदार दिलीप गांधी, महापौर तथा आमदार संग्राम जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. एस. पवार आदी या वेळी उपस्थित होते.
शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले, की बाहय़वळण रस्ता तयार झाला असला तरी शहरात उड्डाणपुलाची गरज आहेच. या पुलाचा खर्च १५ कोटी रुपयांवरून सुरुवातीला ७५ कोटी व आता ८३ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. विकसकाची या वाढीव खर्चाची तयारी नाही. मात्र या पुलासाठी आता नव्याने तीन प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील बैठकीत या प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
वाडिया पार्क क्रीडा संकुलाबाबतचे वाद टोकाला गेल्याचे शिंदे यांनी मान्य केले. ते म्हणाले, मात्र यातून आता सन्माननीय तोडगा काढावा लागेल. हे मैदान खेळाडूंना उपलब्ध झाले पाहिजे. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सर्वाना एकत्र करून यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात जिल्हाधिका-यांनीच पुढाकार घ्यावा, येत्या आठ दिवसांत संबंधित सर्वाची बैठक बोलावून हा वाद मिटवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. नगर शहराच्या विकास आराखडय़ालाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
सायबर गुन्हे चिंताजनक!
सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात राज्याला अजूनही यश आले नसल्याचे शिंदे यांनी मान्य केले. ते म्हणाले, शंभरपैकी अवघे १६ गुन्हे उघड होतात, हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी नुकताच ५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
अतिक्रमणांवर जुगलबंदी
बैठकीत खासदार गांदी व शिंदे यांच्यातच जुगलबंदी रंगल्याचे समजते. शहरातील अतिक्रमणांच्या मुद्दय़ावर गांधी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मात्र अखेर शिंदे यांनीच त्यात हस्तक्षेप करीत आपल्याला प्रश्न वाढवायचे आहेत, की सोडवायचे आहेत, असा सवाल करून यावर योग्य भूमिका घेऊ असे स्पष्ट केले.