ऋतू गुरू झाले की झाडे आपोआप विद्यार्थी होतात. ही निसर्ग अनुभूती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, अवतीभोवतीचे नसíगक बदल टिपण्याची दृष्टी विकसित व्हावी. त्यातून सौंदर्यशास्त्र व साहित्य मनात फुलावे, यासाठी मुलांची फुलांशी गट्टी हा उपक्रम माडज प्रशालेत राबविण्यात आला. दिवसभर फुलांच्या सहवासात मुलांनी शिक्षणातून हा अनुभव घेतला.
उमरगा तालुक्यातील माडज येथील प्रशाला विविध उपक्रमांसाठी परिचित आहे. मायबोली शब्दकोश असो, की विद्यार्थ्यांना थ्रीजी सेवेद्वारे लेखककवींशी संवाद साधण्याचा उपक्रम, प्रशालेतील शिक्षक बालाजी इंगळे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थान मानून असे अनेक प्रयोग केले आहेत. सोमवारी माडज प्रशालेत सर्वत्र फुलांचा दरवळ पसरला होता. अवतीभोवती पाऊस येऊन गेल्यानंतर बहरून आलेला निसर्ग किती विविधांगी आहे, हे शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना फुले गोळा करण्याचे काम दिले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांना फुलांपासून काय काय करता येईल, असा प्रश्न विचारण्यात आला. मुलांनी दिलेल्या उत्तरांप्रमाणे त्यांच्याकडून फुलांचे विविध साहित्य तयार करवून घेण्यात आले. हार, गुच्छ, तोरण, फुलदाणी असे विविध प्रकार मुलांनी त्यांच्या आकलनक्षमतेनुसार तयार केले. शाळेला एखाद्या निसर्गशाळेचे रूप प्राप्त झाले होते.
बालाजी इंगळे यांना या उपक्रमाबाबत विचारले असता, काही मोजकी फुले सोडल्यास विद्यार्थ्यांना फुलांची नावे माहीत नाहीत. त्यांना फुलांची ओळख व्हावी, फुलांचा सुगंध ओळखता यावा, बागेतली फुले व रानफूल यातील फरक कळावा, आपल्या भोवतीचा निसर्ग किती सुंदर आहे, याची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता आठवीच्या ३५ मुला-मुलींनी सोमवारी फुलांशी गट्टी केली. दिवस फुलांच्या सहवासात घालविला. अनेकांना फुलांची नावे, त्यांचा सुगंध अनुभूतीतून समजला. सौंदर्यशास्त्र विषयाची तोंडओळख बालवयातच व्हावी, त्यातून एखादा पर्यावरणतज्ज्ञ, एखादा कवी वा एखादा रसिक निर्माण व्हावा, या अपेक्षेसाठीच मुलांची दिवसभर फुलांबरोबर गट्टी जुळवून आणल्याची प्रतिक्रिया इंगळे यांनी दिली.