FSSAI Bans Old Monk Rum sales : न्यूट्रल स्पिरिटमध्ये कृत्रिम सुगंध आणि चव मिसळल्याचे आढळल्यानंतरभारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) ने महाराष्ट्रात ओल्ड मंकच्या विक्रीवर बंदी घातली होती. मात्र या निर्णयामुळे कंपनीचं ५०० कोटींचं नुकसान, तर महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचं ३५० कोटींचं नुकसान झाल्याची माहिती मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर प्रायव्हेट लिमिटेड या ओल्ड मंक बनवणाऱ्या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दिली. तसंच, यामुळे जवळपास ३०० कामगार बेरोजगार झाल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. बार अँड बेंचने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालय आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी करणार आहे.
FSSAI ने ऑगस्टमध्ये ओल्ड मंकवर बंदी आणली. अतिरिक्त फ्लेवरिंग आणि लेबलिंगच्या चिंतेवरून ओल्ड मंकसह काही विशिष्ट व्हिस्की आणि रम प्रकारांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. महाराष्ट्र युनिटमधील कंपनीच्या प्लांटच्या तपासणीनंतर हा आदेश देण्यात आला होता. याप्रकरणी FSSAI ची भूमिका अशी आहे की, ज्या स्पिरिटमध्ये अतिरिक्त रम फ्लेवरिंग वापरलं आहे, ते थेट ‘रम’ म्हणून विकलं जाऊ शकत नाही.
न्यूट्रल स्पिरिटमध्ये मान्यताप्राप्त ॲडिटिव्ह्ज वापरण्याची परवानगी
मंकच्या लेबलवरील “7 years old blended” आणि “very old vatted अशा वयाशी संबंधित वर्णनांवरही FSSAI ने आक्षेप घेतला आहे. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असे नियामकाचं म्हणणं आहे. कंपनीची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ व्यंकटेश धोंड म्हणाले की, कंपनीच्या इतर युनिट्समधून याच फॉर्म्युलेशनच्या रमची विक्री सुरू आहे. कंपनीने युक्तिवाद केला की नियम नियमावलीनुसार न्यूट्रल स्पिरिटमध्ये मान्यताप्राप्त ॲडिटिव्ह्ज (अतिरिक्त घटक) वापरण्याची परवानगी आहे. तसंच, अशाच प्रक्रियेचा वापर करणाऱ्या इतर प्रतिस्पर्धी ब्रँड्सवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोपही कंपनीने केला.
…तर विक्रीला परवानगी देऊ
FSSAI च्या वतीने हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितलं की, जर कंपनीने उत्पादनाचे वर्णन “रम” ऐवजी “रम-सारखे” केलं, तर विक्रीला परवानगी दिली जाईल. उच्च न्यायालयाने यापूर्वी या बंदीला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंपनीने सुधारित लेबल्स सादर केले होते, यामध्ये “7 years old blended” आणि “very old vatted” अशा प्रकारचे वादग्रस्त वयाचे वर्णन हटवण्यात आलं होतं आणि “ॲडेड फ्लेवर” (अतिरिक्त चव) स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, FSSAIने अद्यापही त्याला मंजुरी दिली नाही.
