अलिबाग – आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे संकेत मिळत असून त्याचे पडसाद आता रायगड जिल्ह्यात उमटू लागले आहेत. विशेषतः दुर्गम व डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्यात पेट्रोल व डिझेल टंचाईचे तीव्र चित्र निर्माण झाले आहे.

तालुक्यातील चारपैकी तब्बल तीन पेट्रोल पंपांवरील साठा पूर्णतः संपला असून केवळ एका पंपावर मर्यादित प्रमाणात पेट्रोल उपलब्ध असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.

पोलादपूर शहरातील एकमेव सुरू असलेल्या पेट्रोल पंपावरही इंधनाचा साठा अत्यंत अपुरा असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना पेट्रोल मिळावे यासाठी प्रतिवाहन फक्त २०० रुपयांपर्यंतच इंधन देण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे दिवसभर पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी वाहनचालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून नागरीकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उर्वरित तीन पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले’ असे फलक झळकत असून पंप पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी रिकाम्या टाक्या घेऊन परतण्याची वेळ आल्याचे सांगितले.

प्रशासनाच्या वतीने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे चित्र आहे. पुरवठ्यातील अडथळे, वाहतूक समस्या आणि वाढती मागणी यामुळे टंचाई अधिक तीव्र झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंधन टंचाईचा परिणाम आता दैनंदिन जीवनावरही होऊ लागला आहे. खासगी वाहनधारकांसोबतच प्रवासी वाहतूक, मालवाहतूक तसेच शेतकऱ्यांच्या कामांवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. काही ठिकाणी भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान अनावश्यक साठेबाजी टाळावी तसेच प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.