लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने अनेकांनी स्वयंपाकासाठी विजेवर चालणार्या उपकरणांचा पर्याय निवडला आहे. इलेक्ट्रिक कुकर, मायक्रोवेव्ह ओव्हन, ओटीजी-ओव्हन, टोस्टर, ग्रिल, मल्टी कुकर, इलेक्ट्रिक तवा, एअर फ्रायर, इलेक्ट्रिक स्टिमर, हॉट प्लेट यांच्या खरेदीत वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने ७ मार्च रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ केली. त्यानंतर आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. मुंबईत अनेक ग्राहकांना सिलिंडर आरक्षित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावध भूमिका घेऊन पर्यायी मार्गांचा शोध घेणे सुरू केले आहे. बाजारात स्वयंपाकासाठीच्या विजेवर चालणार्या उपकरणांची मागणी वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
पुढील आठवडाभरात स्थिती न बदलल्यास देशाला इंधन टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम असल्याने बाजारात विजेवर चालणार्या स्वयंपाक उपकरणांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यापार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
‘सीएनजी-पीएनजी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता’
मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम सध्या सीएनजी- पीएनजीच्या पुरवठ्यावर झाला नसला तरी कपात होण्याची शक्यता असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले. पीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यास सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, पण सीएनजीअभावी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडेल. मुंबई, ठाणे, नवी मंबई, पनवेलसह उरणमध्ये महानगर गॅस लिमिटेडतर्फे पीएनजीचा पुरवठा केला जातो. सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक घरगुती आणि ५,६०० औद्योगिक आस्थापनांमध्ये पीएनजी वापरला जातो. याशिवाय १२ लाखांपेक्षा जास्त वाहने सीएनजीवर धावतात.
