भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापन आणि शासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने शहराजवळील पानेवाडी प्रकल्पातील सर्व ३२६ इंधन टँकर वाहतूकदार ३० एप्रिलपासून बेमुदत संप करणार आहेत. या संपाचा परिणाम राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील भारत पेट्रोलियमच्या पंपांवर होणार असून इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
टँकरचालकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवारपासून संप होणार होता. परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील, प्रांत उदय किसवे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार, कंपनी व्यवस्थापन आणि वाहतूकदार प्रतिनिधी यांच्यात रविवारी रात्री बैठक झाली. प्रकल्प व्यवस्थापक संजय गुप्ता हे बैठकीस अनुपस्थित होते. त्यामुळे बैठकीत कोणताही ठोस निर्णय निघू शकला नाही. त्यामुळे मंगळवारपासून बेमुदत संप होणार असल्याची घोषणा टँकरचालकांनी सोमवारी रात्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या संपाचा फटका प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाडय़ातील काही भागात होणार आहे.