|| रवींद्र जुनारकर

पुणे विद्यापीठाला १०० तर  गोंडवाना विद्यापीठातील पाच महाविद्यालयांना प्रत्येकी २ कोटी

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा) अंतर्गत गोंडवाना विद्यापीठातील पाच महाविद्यालयांना पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी दोन कोटी प्रमाणे एकूण दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, देशभरातील ४७२ महाविद्यालयांना हा निधी मंजूर झाला असून त्यात महाराष्ट्रातील १७५ पेक्षा अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे विद्यापीठाला १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांकडून पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव ऑनलाईन मागवण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यापीठ व महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवले होते. विद्यापीठांना १०० कोटी, अ‍ॅटोनामस महाविद्यालयांना ५० कोटी तर खासगी महाविद्यालयांना प्रत्येकी २ कोटीचा निधी वितरित करण्याचा हा प्रस्ताव होता. त्यानुसार पुणे विद्यापीठाला १०० कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत पाच महाविद्यालयांनाही निधी मिळालाआहे. त्यामध्ये सवरेदय शिक्षण मंडळाद्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, गडचिरोली जिल्हय़ातील श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा, महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी व शंकरराव बेझलवार महाविद्यालय, अहेरी यांचा समावेश आहे. केवळ पायाभूत सुविधांसाठीच हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या निधीतून इतर कुठलीही कामे करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश यात आहेत.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार ही रक्कम मंजूर झालेली आहे. ए ग्रेडचे महाविद्यालय असल्यामुळेच हा निधी मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रातील 

महाराष्ट्रात केवळ पुणे या एकमेव विद्यापीठाला हा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील बहुतांश सर्वच जिल्हय़ातील १७५ पेक्षा अधिक महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. देशभरातून ७५० महाविद्यालयांनी यासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यातील ४७२ महाविद्यालयांना हा निधी देण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक १७५ महाविद्यालये आहेत.