सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला सध्या पूर आला आहे. नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पितापूर आणि आकांतळा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची खूपच कमी असल्याने हा पूल पाण्याखाली गेला आहे. अशा स्थितीत परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. दरम्यान याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा चक्क पुराच्या पाण्यातून काढावी लागली आहे. गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून मृतदेह नदीच्या दुसऱ्या बाजुला नेला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नूरअली साहेब अली भंडारी असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते पितापूर येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यातून त्यांची अंत्ययात्रा काढली आहे.

पितापूर आणि आकांतळा दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने गावकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पितापूर येथील ग्रामस्थांना मृतदेह चक्क नदीच्या पाण्यातून नेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील या विदारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित दोन गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी गावकरी प्रशासनाकडे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funeral procession through flood water harana river not have bridge akkalkot solapur rmm
First published on: 09-08-2022 at 18:06 IST