मुंबईत आज ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. गेल्या काही वर्षांतील निवडणूक आयोगाच्या गोंधळाच्या कारभारावर आक्षेप घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची प्रमुख मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे. दुसरीकडे या मोर्चात गब्बरची एंट्री झालेल्या पाहण्यास मिळाली. मनसेचा जालना येथील कार्यकर्ता गब्बरच्या वेशात या आंदोलनात सहभागी झाला होता.

मनसे कार्यकर्त्याने नेमकं काय म्हटलं आहे?

मनोज निर्मळ नावाचा मनसे कार्यकर्ता गब्बरच्या वेशात या आंदोलनात सहभागी झाला होता. मनोज निर्मळ हे जालना या ठिकाणाहून मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्ञानेश कुमारने राजीनामा द्यावा नहीं तो गब्बर गोलीसे उडा देगा. असं म्हटलं आहे. १०० टक्के राजीनामा झाला पाहिजे. मतदान आम्ही केलं पण त्यात भ्रष्टाचार झाला आहे. लोकांचा जो हक्क आहे ज्याला मतदान केलं त्याला मत मिळालंच नाही. त्यामुळे हा घोटाळा करणाऱ्या ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी गब्बरच्या वेशात आलेल्या मनोज यांनी केली. शोले या सिनेमाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही या सिनेमाचं गारूड आजच्या पिढीवरही कायम आहे. आंदोलनात गब्बरची वेशभूषा करून आलेला हा कार्यकर्ता जणू तोच संदेश देत होता. दरम्यान आपल्या भाषणांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही ज्ञानेश कुमार आणि भाजपावर जोरदार टीका केली.

ज्ञानेश कुमार म्हणजे भाजपाचं हत्यार-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत आपण देखील भाजपसोबत वाहत गेलो होतो. मग त्यांनी काँग्रेस एवढा भ्रष्ट सरकार नाही, असं वातावरण केलं. पण आता संपूर्ण इंडिया उभा राहिलेला आहे, इंडिया अगेन्स्ट व्होट चोर. १३ कोटी मतदान तुम्ही अचानक गाळत आहात. बंगालमध्ये आतापर्यंत अवैध ठरलेल्या अर्जांची छाननी झाली, त्यातल्या काही लोकांना वैध ठरवले गेले आणि ती सुनावणी तिकडे सुरू आहे, पण उरलेल्या मतदारांची छाननी होऊन तो निकाल किंवा तपास पूर्ण व्हायला जवळपास १४६ महिने लागतील. हे प्रकरण इथपर्यंत थांबत नाही.

राज ठाकरे काय म्हणाले?

मला सत्ताधारी पक्षाला एकच सांगायचं आहे की आम्हाला कुठलाही राग नाही किंवा आसूया नाही. तुम्ही सत्ता कशी राबवता आहात आणि कशातून राबवत आहात त्याचा आम्हाला राग आहे. लोकांनी ठरवावं की कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला विरोधात. लोकांनी ठरवलं पाहिजे, निवडणूक आयोगाने नाही. सध्या मनमानी कारभार सुरू आहे, एकाच उद्योगपतीला विमानतळं दिली, जंगलं दिली, पोर्ट दिले. काय चाललंय काय? आम्ही काही केलं तरी फरक पडत नाही हे निवडणूक आयोगाला बांधल्यामुळे होतं आहे. या देशातल्या जनतेने काहीही बोलावं, काहीही सांगावं, निवडणूक आयोग आमच्यासह असेल तर आम्ही मनाला येईल तसं वागू. आम्हाला अमेरिकेला सरेंडर व्हायचं आहे तर होऊ, पेट्रोलचे भाव वाढवू, तुम्हाला रांगेत उभं करू. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असतो तेव्हा त्यांना भीती असते. लोकांनी मतदान केलं नाही तर आपली सत्ता जाईल, अशी कुठलीही भीती महाराष्ट्रातही नाही, केंद्रातही नाही कुठेही दिसत नाही असंही राज ठाकरे म्हणाले