गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी

शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी यांत्रिकीकरणाला स्विकारण्याचे केले आवाहन

Gadchiroli-District Collector planted paddy in the field
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जावून दिले प्रोत्साहन

गडचिरोली: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यात दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला सुरूवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे ,असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हाअधीक्षक, कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बांधावर जावून दिले प्रोत्साहन

जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले. कृषी विभागाने नियोजन व मानव विकास योजनेतून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप योजना घेतली आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच त्यांचा शेतीमधील इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येत्या काळात जिल्ह्यातील रब्बी मधील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात ४० मशीन घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रती मशीन १०० एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gadchiroli district collector planted paddy in the field srk