रवींद्र जुनारकर

नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. येथे ३२२ जणांचा मृत्यू झाला असून मृत्युदर १.७३ पर्यंत पोहोचला आहे. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.०१ टक्के, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण २४.२६ टक्के आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राणवायू खाटा, व्हेंटिलेटर,  रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठ्याला तातडीने मंजुरी दिली आहे.

राज्याच्या सर्वात शेवटच्या टोकावर वसलेल्या या आदिवासी जिल्ह्यात करोनादेखील सर्वात शेवटी पोहोचला. मात्र हळूहळू करोनाने येथे पाय पसरले. त्याचा परिणाम आज या लोकसंख्येने छोट्या जिल्ह्यात दररोज ५०० ते ६०० करोनाबाधित मिळत आहेत. आतापर्यंत ३२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. येथे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग आहे. मात्र येथील आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असल्याने या जिल्ह्यातील बहुसंख्य रुग्ण चंद्रपूर व नागपूर जिल्ह्याचा आधार घेतात. सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तीन तालुक्यांतील बाधित तेलंगणा राज्यात उपचारासाठी जातात. मृत्यूचे प्रमाण १.७३ टक्क्यांवर गेल्याने आता चिंता वाढली आहे. जिल्ह्याच्या प्राणवायू, रेमडेसिविर व इतर औषधांचा मंजूर व अतिरिक्त कोट्यासाठी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित सचिवांना दूरध्वनीद्वारे मागणी केली.  गडचिरोली जिल्ह्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे. येत्या आठवड्यात गडचिरोली सामान्य रुग्णालयातील २६५ सिलेंडरचा प्राणवायू जनरेटर प्रकल्प सुरू होत असून दुसरा १३५ सिलेंडरचा प्राणवायू जनरेटर प्रकल्प सुरू होणार आहे. पालकमंत्री शिंदे यांनी या वेळी भविष्यातील प्राणवायूची गरज लक्षात घेऊन सिरोंचा, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, कोरची व एटापल्ली या ठिकाणीसुद्धा कमी क्षमतेचे प्राणवायू जनरेटर प्रकल्प सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात प्राणवायू खाटा वाढवणे आवश्यक असून त्याप्रमाणे सिरोंचा, वडसा अशा ठिकाणी तातडीने ती वाढवली जात आहेत.

पालकमंत्र्यांकडून २०० रेमडेसिविर

पालकमंत्री यांनी २०० रेमडेसिविर इंजेक्शन्स आरोग्य विभागाकडे सुपूर्द केले. संपूर्ण देशासह राज्यात प्राणवायू किंवा रेमडेसिविरसारख्या औषधांचा तुटवडा आहे. उपलब्ध साठा गरजूंना मिळेल यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. इतरही औषध येथे तात्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला सक्रिय राहण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

सेवाभावी डॉक्टरांच्या रुग्णालयांसाठी निधी

गडचिरोली शहरातील सेवाभावी डॉक्टरांनी प्रशासनाकडे १०० खाटांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आवश्यक निधी नगरपालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी या वेळी दिले.  आवश्यक तरतुदींची तपासणी करून सदर १०० कोविड खाटांच्या  रुग्णालयाला आरोग्य विभागाने मंजुरी प्रदान करावी, अशा सूचना पालकमंत्री यांनी केल्या आहेत. नगर परिषदेला दिलेला निधी हा संपूर्ण  रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी नगरविकास विभागाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता येथे १०० खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय लवकरच सुरू होणार आहे.

आमदार निधी देणार

जिल्ह्यातील आमदारांनी प्रत्येकी एक-एक कोटी रुपये निधी प्राणवायू कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्वांचे स्वागत केले. आता लवकरच येथे प्राणवायू कॉन्संस्ट्रेटर उपलब्ध होतील अशी आशा आहे.

नगरपालिका प्रशासनाला ५ कोटींचा निधी

नगरपालिकांच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कामे होत असतात. शहरात कोविड रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असते. यासाठी विविध तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नगरपालिका प्रशासनाला पाच कोटी रुपये आकस्मिक निधी देण्याचे जाहीर केले. सदर निधी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांना वाटप करण्यात येणार आहे.