खोब्रामेंढा – हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवादी व पोलीस पथकात झालेल्या चकमकीत पायाला गोळी लागून गंभीर जखमी झालेला टिपागड दलम कमांडर किशोर उर्फ गोंगलू उर्फ सोबू घिसू कवडो याला नक्षलवादी जंगलात सोडून पळून गेले होते. हा जखमी नक्षली कमांडर कवडो व त्याचा सहकारी गणपत कोल्हे या दोघांनाही अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे. नक्षल कमांडर कवडो याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. शिवाय, २२ चकमकीत व आठ हत्यांमध्येही त्याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. नागपुरमधील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उपविभाग धानोरा अंतर्गत पोलीस मदत केंद्र कटेझरी येथील पोलीस पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना २९ मार्च रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा येथे झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीमध्ये जखमी झालेला जहाल नक्षलवादी टिपागड दलम डीव्हीसी किशोर उर्फ गोंगलू उर्फ सोबु घिसू कवडो (३८) रा. रामनटोला, ता.एटापल्ली याला पकडण्यात कटेझरी पोलीस पथकाला यश मिळाले आहे.

जहाल नक्षली किशोर कवडो याच्या पायाला खोब्रामेंढातील चकमकीदरम्यान बंदुकीची गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. यानंतर त्याला जखमी अवस्थेत सोडून नक्षलवादी जंगलातून पळून गेले होते. किशोर कवडोचा २२ चकमकीत समावेश असून, ८ खून व ६ जाळपोळीचा घटना तसेच अन्य सहा गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्यामुळे त्याच्यावर गडचिरोली पोलीस दल कारवाई कठोर करणार आहे. त्याच्यासोबत गडचिरोली पोलीस दलाच्या विरोधात विघातक कृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांना व जखमी नक्षल कमांडर किशोर कवडो याला मदत करणारा नक्षल समर्थक गणपत कोल्हे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

६ एप्रिल रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा व कटेझरी पोलीस पथकाला, गणपत कोल्हे या नक्षल समर्थकाच्या मदतीने किशोर कवडो लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कटेझरी पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवून मोठ्या शिताफीने किशोर कवडो याला अटक केली. त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेले आहे. पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक गोयल यांनी केले आहे.