नक्षलवादी विरोधातील लढाईला गडचिरोली पोलीस दलास मोठे यश हाती लागले आहे. पोलीस उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्ट पेरमिली हद्दीत मिळालेल्या सूत्रांच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे पेरमिली जंगल परिसरात पोलिसांचे विशेष अभियान पथक गस्त घालत होते. त्यावेळी नक्षल विरोधी अभियान राबवताना रात्री जहाल नक्षली मंगरु कटकु मडावी याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे. अटक करण्याता आलेल्या नक्षलवाद्यावर यापूर्वी निष्पाप नागरिकांची हत्या तसेच पोस्टवर हल्ला करण्यासारखे हिंसक गुन्हे दाखल आहेत.

मंगरु मडावी हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असणाऱ्या मौजा विसामुंडी पोमके नारगुंडा ता. भामरागड येथील रहिवासी होता. मंगरु मडावी हा पेरमिली एलओएस मध्ये एलओएसच्या सदस्य पदावर भरती होवून ॲक्शन टिम मेंबर म्हणून कार्यरत होता. तसेच तो प्रतिबंधीत असलेल्या दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचा वरिष्ठ कॅडर होता.

काही दिवसांपूर्वी पोमके बुर्गी हद्दीतील उपसरपंच रामा तलांडी याच्या खुनामध्ये तसेच पोमके बुर्गी पोस्टवर हल्ला करण्यामध्ये मंगरु मडावी समावेश होता. त्यांच्यावर तीन खून, एक चकमक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रचारास आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) शसमीर शेख सा., अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.