रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

गडचिरोली : मागील काही वर्षांत गडचिरोली पोलीस दलाने दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ व जंगलव्याप्त भागात विश्वासू खबऱ्यांचे विणलेले जाळे तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारावर सी-६० पथक व विशेष कृती दलाने यशस्वी केलेल्या मोहिमांमुळेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तथा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात नक्षलवादी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजाविलेला मिलिंद तेलतुंबडे, विभागीय समिती सदस्य तथा कंपनी चार सदस्य लोकेश मडकाम, कसनासूर दलम कमांडर तथा विभागीय समिती सदस्य महेश गोटा याच्यासह एक कोटी ३६ लाखाचे बक्षीस असलेल्या २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात  यश मिळाले आहे.

इंद्रावती व गोदावरी नदीचे पात्र ओलांडले की नक्षलवाद्यांना महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्रप्रदेश या तीन राज्यात मुक्तसंचार करता येतो.  पूर्वी पोलीस दलाच्या प्रत्येक हालचालींची माहिती नक्षलींना मिळत होती. त्याचा परिणाम नक्षलींना भूसुरुंग घडवून आणण्यात यश मिळत गेले. नक्षलींना खबऱ्यांकडून मिळत असलेल्या माहितीवरूनच यश मिळत असल्याची बाब गडचिरोली पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हेरली. 

गडचिरोली पोलिसांनी दुर्गम, अतिदुर्गम, डोंगराळ व जंगलव्याप्त भागात खबऱ्यांचे जाळे उभे करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, हे जाळे विणताना त्यांना आर्थिकपासून तर सर्व प्रकारची मदत पोलीस दलाच्या वतीने पुरवण्यात आली.  परिणामी, पोलिसांना अतिदुर्गम भागातील नक्षलींचे शिबीर सुरू आहे, कुठे नक्षलवादी एकत्र येणार आहेत, याची माहिती मिळत गेली. खबऱ्यांकडून  मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर सी-६० पथक व विशेष कृती दलाने मोहिमा आखण्यास सुरुवात केली.  एप्रिल २०१८ मध्ये गडचिरोली बोरिया-कसनासूरच्या जंगलात एकाच वेळी ३४ नक्षलींना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. नक्षलींना होणाऱ्या धान्य पुरवठय़ापासून तर ग्रामस्थांकडून मिळणारे जेवण, गावातील नक्षल समर्थक, नक्षली गावात कोणत्या वेळात येतात या सर्वाची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळत गेली.

नियोजनबद्ध मोहीम

नक्षलवाद्यांची संख्या किती, त्यांच्याकडे शस्त्रसाठा किती याची अचूक माहिती देखील पोलिसांना खबऱ्यांकडून मिळत गेली. छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील मर्दिनटोला जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर होणार असल्याची माहितीही पोलिसांना विश्वसनीय खबऱ्याने दिली होती. खात्रीलायक माहिती मिळताच शुक्रवारी संध्याकाळपासूनच गडचिरोली पोलीस दलाने एकेक करून सी-६० पथकाच्या सोळा तुकडय़ा अर्थात ३०० कमांडो या भागात तैनात केले होते. विशेष म्हणजे, मिलिंद तेलतुंबडे या शिबिरात हजर आहे याची माहिती पोलीस दलाला होती. तेलतुंबडे व छत्तीसगडमधील नक्षली कमांडर असल्याची खात्री होताच अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अतिशय चतुराईने ही मोहीम आखली. पोलिसांच्या या मोहिमेची कल्पनाही नक्षलींना आली नाही. त्याचा परिणाम एकाच ठिकाणी शंभरपेक्षा अधिकच्या संख्येत नक्षली एकत्र आले होते. पोलिसांनी नक्षलींना अशा पद्धतीने चारही बाजूंनी घेरले होते की नक्षलींना इथून निघण्यासाठी गोळीबार करण्याशिवाय पर्याय उरला नाही. नक्षलींच्या या गोळीबाराला सी-६० पथकातील प्रशिक्षित कमांडोंनी जोरदार उत्तर दिले. या चकमकीत  मििलद तेलतुंबडे, विभागीय समिती सदस्य तथा कंपनी चार सदस्य लोकेश मडकाम, कसनासूर दलम कमांडर तथा विभागीय समिती सदस्य महेश गोटा यांच्यासह एक कोटी ३६ लाखाचे बक्षीस २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर मर्दिनटोला जंगलात सलग साडेनऊ तास चाललेल्या या चकमकीत तीनशेपेक्षा अधिक कमांडो सहभागी झाले होते. 

सोमय मुंडे यांचे यश

गडचिरोली पोलीस दलातील तरुण आयपीएस अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे नक्षलवाद्यांविरुद्धच्या या चकमकीतील खरे नायक ठरले. मर्दिनटोलाच्या जंगलात १०० नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू आहे, त्या शिबिरात जहाल नक्षलवादी मििलद तेलतुंबडे सहभागी झाला असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर सोमय मुंडे यांनी ही मोहीम आखली आणि यशस्वी करून दाखवली.

त्रिस्तरीय सुरक्षा कवच भेदले

तेलतुंबडे ऊर्फ दीपक ऊर्फ सह्यांद्री ऊर्फ जीवा याला नक्षल दलमचे त्रिस्तरीय सुरक्षा कवच होते. या त्रिस्तरीय सुरक्षा कवचामुळेच तेलतुंबडे आजवर पोलिसांच्या कारवायांमधून  निसटून जात होता. मात्र या चकमकीत सी-६० पथकान हे त्रिस्तरीय सुरक्षा कवच भेदले. पोलिसांनी हे कवच भेदण्यापूर्वी तेलतुंबडे याचा अंगरक्षक भगतसिंग ऊर्फ प्रदीप ऊर्फ तिलक मानकूर जाडे याने तेलतुंबडेला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. भगतसिंग चकमकीत मारला गेला. भगतसिंग ठार होताच सुरक्षा कवच भेदले गेले आणि सी-६० पथकाने तेलतुंबडे याला अचूक टिपले.

सी-६० पथक, नक्षलविरोधी अभियान पथकासह संपूर्ण गडचिरोली पोलीस दलाचे हे यश आहे. यामुळे उत्तर गडचिरोलीत नक्षली चळवळीला जबरदस्त हादरा बसला आहे. या यशानंतरही नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र करू.  – अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

तेलतुंबडेच्या मृत्यूने महाराष्ट्रातील नक्षल चळवळीचा बॅकबोन संपवण्यात यश आले आहे. संपूर्ण गडचिरोली पोलीस दल कौतुकास पात्र आहे.

– संदीप पाटील, उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र