गडचिरोलीत पोलीस, सामाजिक कार्यकर्ते विरुद्ध नक्षलवादी!

हिंसाचाराच्या भीतीमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात राजकीय पक्षांचा प्रचार सुरू नसला तरी मतदानाच्या मुद्यावरून पोलीस, सामाजिक कार्यकर्ते विरुद्ध नक्षलवादी, असे पत्रकयुद्ध मात्र जोमात सुरू आहे.

हिंसाचाराच्या भीतीमुळे गडचिरोलीच्या दुर्गम भागात राजकीय पक्षांचा प्रचार सुरू नसला तरी मतदानाच्या मुद्यावरून पोलीस, सामाजिक कार्यकर्ते विरुद्ध नक्षलवादी, असे पत्रकयुद्ध मात्र जोमात सुरू आहे.
दरवेळेप्रमाणे यंदाही नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. दुर्गम भागात स्वत:चे अस्तित्व राखून असणारे नक्षलवादी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार सुद्धा करू देत नाहीत. अनेकदा प्रचाराची वाहने जाळतात. या वाहनात बसलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात. त्यामुळे दुर्गम भागात प्रचाराला जायचेच नाही, असे गडचिरोलीतील सर्वच प्रमुख उमेदवारांनी ठरवून टाकले आहे. आता निवडणूक दहा दिवसांवर आली तरी दुर्गम भागात प्रचार नसल्याने शांततामय वातावरण आहे. या वातावरणाला सध्या सुरू झालेल्या पत्रकबाजीने मात्र छेद दिला आहे. दुर्गम भागात भरपूर मतदान घडवून आणायचे, असा निर्धार केलेल्या पोलीस दलाने ठिकठिकाणी मोठमोठे फलक लावून व पत्रके वाटून नागरिकांनी मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन करणे सुरू केले आहे. यावेळी पोलिसांच्या मदतीला काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा धावून आले आहेत.
काही दिवसापूर्वी या भागात शोधयात्रा काढणारे नागपूरचे प्रा. अरविंद सोहनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुर्गम भागात हजारो पत्रके वाटली आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडावा व लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, नक्षलवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार न टाकता सामान्य नागरिकांना मतदानासाठी जाऊ द्यावे, असेही आवाहन या पत्रकांमधून केले आहे. या भागात भरणाऱ्या प्रत्येक आठवडी बाजारात पोलीस व या सामाजिक कार्यकर्त्यांची पत्रके वाटण्यात आली आहेत. याशिवाय निवडणूक आयोगानेसुद्धा नागरिकांनी मतदानात भाग घ्यावा, असे आवाहन करणारी पत्रके या भागात वितरित केली आहेत. यात अनेक मान्यवरांचे संदेश देण्यात आले आहेत. या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांनीसुद्धा याच भागात पत्रके वाटणे सुरू केले आहे. यात राजकीय नेतृत्वावर टीका करण्यात आली असून, या निवडणुका म्हणजे निव्वळ ढोंग आहे, असे म्हटले आहे. नक्षलवाद्यांनी राजकीय पक्षांना भांडवलदारांचे हस्तक म्हणून संबोधले आहे. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या या पत्रकबाजीमुळे दुर्गम भागात प्रचार नसला तरी निवडणुकीचे वातावरण मात्र तयार झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gadchiroli police social activist against naxalite