गडचिरोली : जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) अंतर्गत मंजूर होणाऱ्या विकासकामांच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि खोट्या शासकीय पत्रांचा वापर करून प्रशासकीय मान्यता आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी दोन कोटी रुपये आणि जिल्हा परिषदेसाठी दोन कोटी रुपये अशा एकूण चार कोटी रुपयांच्या कामांसंदर्भातील बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करण्यात आल्याचे समोर आले असून, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संशयास्पद कागदपत्रांमुळे उघडकीस आला प्रकार
जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत विविध विकासकामांच्या प्रस्तावांना जिल्हा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संबंधित कामांना प्रशासकीय मान्यता दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळात काही संशयास्पद आदेश आणि निधी वितरणासंदर्भातील कागदपत्रे फिरत असल्याची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत हा गंभीर प्रकार समोर आला.
व्हॉट्सॲपवरील पीडीएफमधून उलगडला बनावटगिरीचा पर्दाफाश
२२ जून रोजी जिल्हा खनिकर्म विभागातील एका संगणक ऑपरेटरच्या व्हॉट्सॲपवर दोन प्रशासकीय मान्यता आदेशांच्या पीडीएफ प्रती पाठविण्यात आल्या. आदेश क्रमांक २८६/२०२६ आणि २८७/२०२६ असलेल्या या कागदपत्रांबाबत संबंधित कामांना मंजुरी मिळाली आहे का, अशी विचारणा करण्यात आली होती. संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता, या आदेशांवरील जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, संबंधित प्रशासकीय मान्यता पत्रे शासकीय नमुन्याप्रमाणे इतक्या हुबेहूब पद्धतीने तयार करण्यात आली होती की प्रथमदर्शनी ती खरी असल्याचा भास होत होता.
ठेकेदारांकडून पैशांची मागणी? राजकीय दुव्यांचीही चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका राजकीय व्यक्तीने हे कथित मान्यता आदेश काही ठेकेदारांकडे पाठवून आर्थिक व्यवहारासाठी दबाव टाकल्याची आणि पैशांची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी तपास यंत्रणांनी या दिशेनेही चौकशी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे हा प्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून बनावट प्रशासकीय मान्यता तयार करून ठेकेदारांची फसवणूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटित रॅकेटचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हा दाखल; सूत्रधारांचा शोध सुरू
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून फौजदारी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार सहाय्यक जिल्हा खनिकर्म अधिकारी राहुल विश्वनाथ राठोड यांनी २३ जून रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या बनावटगिरीमागील सूत्रधार, संभाव्य आर्थिक व्यवहार आणि त्यातील राजकीय अथवा प्रशासकीय संबंधांचा शोध घेण्याचे आव्हान आता तपास यंत्रणांसमोर आहे.
