रत्नागिरी :  संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सोमवारी सकाळपासून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच नागरिकांनी आणि पर्यटकांनी धरण परिसरात तसेच सांडव्याजवळ कोणतीही धाडसाची कृती करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाने ५ जुलै २०२६ रोजी केलेल्या पर्जन्यमापन आणि जलसाठा नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी १२२.२० मीटरवर पोहोचली असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ६६.८५१३ दशलक्ष घनमीटर, तर उपयुक्त पाणीसाठा ६६.५३९३ दशलक्ष घनमीटर इतका नोंदविण्यात आला आहे.

५ ते ६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धरण क्षेत्रात १०३ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू पावसाळ्यात आतापर्यंत एकूण ९९४ मिमी पर्जन्य झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वेगाने वाढ झाली आणि ६ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता धरण भरून वाहू लागले. त्यावेळी धरणाची पाणीपातळी १२१.२० मीटर इतकी होती.

धरण भरल्यानंतर सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मध्यम पाटबंधारे प्रकल्पांपैकी असलेला गडनदी प्रकल्प हा संगमेश्वर परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचा मानला जातो.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून सिंचनासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, धरण सांडव्यातून पाणी वाहू लागल्याने परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, धरणाच्या पाण्यात उतरू नये, सांडव्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये किंवा छायाचित्रे काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी उभे राहू नये, असा इशारा चिपळूण पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने दिला आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.