शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांची आता या पदावर निवड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यानंतर आता त्याचे अतर्गत राजकीय पडसाद पाहायला मिळू लागले आहेत. शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची फेब्रुवारी महिन्यात मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव २१ फेब्रुवारीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. आता याबाबतची अधिकृत माहिती आज (२३ मार्च) लोसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, आता यावर खासदार संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे ही वाचा >> “राहुल गांधींनी माफी मागावी”, सावरकरांवरील वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळ, संजय शिरसाट आक्रमक, म्हणाले, “यांनी कसाबचा…” 'शिवसेना' शिंदेकडे राज्याच्या विधिमंडळातील आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी दिला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. त्यानंतर तीनच दिवसांनी शिंदे गटाने पक्षाच्या कार्यकरारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरून हटवून त्याजागी गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली. त्याची आज अधिकृत माहिती लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे.