यंदाही विसर्जन सोहळ्यावर करोनाचं सावट; साश्रू नयनांनी भक्त देणार बाप्पाला निरोप

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.

राज्यात गणेशोत्सवाला १० सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उजाडला आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याही वर्षी शांततेत आणि अनेक नियमांचं पालन करुन भक्तांना बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे.

पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन होणार असून सकाळी ११ वाजता कसबा गणपतीचं विसर्जन होईल. त्यानंतर मानाच्या इतर चारही गणपतींचं विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद राहणार असून केवळ हॉटेल्स आणि अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं सुरू राहणार आहेत. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता पुण्यातला बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि शिवाजी रस्ता आज दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा – अनंत चतुर्दशीनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज

तर पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आलेला आहे. तर मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसमोर राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने करोना महामारीसंदर्भातली रांगोळी साकारण्यात आली आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरासमोर गर्दी केली आहे.

तर मुंबईतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचं विसर्जनही यंदा कोणताही गाजावाजा न करता होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५.३० या वेळात नेहमीच्या मार्गाने ट्रकवरुन मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येईल. यादरम्यान कोणतीही मिरवणूक नसून पदयात्राही काढण्यात येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गात कोणत्याही भाविकाला रस्त्यावर येऊन दर्शन घेता येणार नाही. फुटपाथच्या आतच उभं राहून भाविकांना आपल्या आराध्याचं दर्शन घेता येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ganesh visarjar 2021 strict rules because of spread of coronavirus vsk