अलिबाग : पेण तालुक्यातील हमारापूर येथील गणेश मूर्ती व्यवसायाला समूह विकासाची जोड मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या मदतीने याबाबतचा हा उपक्रम राबविला जाणार असून, यासाठी श्री मोरया गणपती आयडॉल फाऊंडेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी साडे चार कोटीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या सुक्ष्म आणि लघु समूह विकास र्कायक्रमांर्तगत हमरापूर येथील गणेश मूर्ती व्यवसायिकांसाठी समूह विकास योजना राबविण्यात येणार आहे. या व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करून त्याचा एकत्रिक विकास करणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठी हमरापूर जोहे परिसरातील साडे तीनशेहून अधिक गणेश मूर्तीकार व्यवसायिक एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन कंपनीची स्थापना केली आहे. याच परिसरातील जागा भाडेतत्वावर घेऊन या ठिकाणी प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. जागा निश्चितीही झाली आहे. प्रकल्प आराखडा देखील तयार करण्यात आला असून, तो मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे.

आणखी वाचा-CM Eknath Shinde : “मी मुख्यमंत्री झालो हेच काहींना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठी व्यवसायिकांना परराज्यांवर अवलंबून रहावे लागते ही समस्या लक्षात घेऊन आता हमरापूर येथे कच्चा माल साठवण केंद्रांची उभारणी केली जाईल, त्याचबरोबर मूर्तिकारांना प्रशिक्षण देण्यासाठी एका प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाईल, सामुहीक प्रोसेसिंग युनिटची निर्मिती करून त्यात, इंजेक्शन मोल्डींग आणि फ्लोरोसंट कलरींग मशिन्सची परदेशातून बनवून या ठिकाणी बसवून घेतल्या जातील.

यांत्रिकीकरणामुळे व्यवसायाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे. वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी कंपनीमधील भागीदारांनी १० टक्के निधी उभारचा आहे. तर उर्वरीत ९० टक्के निधी केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे.

आणखी वाचा-शिवसागर जलाशयात शिवप्रताप तराफा दाखल; कोयनेतील दळणवळण होणार सोयीचे; संभाजी शिंदेंच्या हस्ते पूजन

पेण तालुक्यातील जोहे, हमरापुर परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या ३५० हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास २०लाख गणेशमूर्त्या तयार केल्या जातात. ज्या देशा विदेशात पाठवल्या जातात. या मुर्तीकला व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ५० कोटींची उलाढाल होत असते. समुह विकास प्रकल्पामुळे या व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘जे कारागीर मोठ्या किंमतीची यंत्रे विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी सामुहिक सुविधा केंद्र सुरु केली जातील. ज्यामुळे गावातील लहान कारारिगांनाही उद्योगवाढीसाठी मदत होईल. सुरवातीला हमरापूर जोहे परिसरातील गणेशमूर्तीकारांसाठी तर नंतर पेण शहरातील मूर्तीकारांसाठी समूह विकास योजना राबविली जाईल’ -गु. श. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र