अलिबाग – गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील बाजारपेठांमध्ये लगबग सुरू होते. मूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलांची आरास आणि पूजेच्या साहित्याबरोबरच पारंपरिक वाद्यांचीही मागणी वाढते. याच मागणीला प्रतिसाद देत उत्तर भारतातील पारंपरिक ढोलकी कारागिरांची पावले दरवर्षी कोकणाकडे वळतात. गणेशोत्सव त्यांच्या दृष्टीने केवळ व्यवसायाचा हंगाम नसून पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या कलेला बाजारपेठ मिळवून देणारा उत्सव ठरतो.

रायगड जिल्ह्यातील पेण येथे मुंबई-गोवा महामार्ग आणि रेल्वे स्थानक परिसरात उत्तर भारतातून आलेल्या अरबाज इकबाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्पुरता संसार थाटला आहे. ढोलकी बनविण्यासाठी आवश्यक साहित्य, लाकूड, हत्यारे आणि तयार ढोलक्या घेऊन आलेले हे कारागीर दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात. तयार झालेल्या ढोलक्या घेऊन ते रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये फिरत विक्री करतात.

अरबाज इकबाल यांच्यासाठी कोकण नवे नाही. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी कोकणात येत आहेत. उत्सव संपल्यानंतर पुन्हा आपल्या गावी परतण्याचा हा नेहमीचा क्रम आहे. अलिबाग शहराजवळील बायपास परिसरातही उत्तर भारतातून आलेल्या शेख कुटुंबाने अशाच पद्धतीने आपला तळ ठोकला आहे.

कोकणातील गणेशोत्सवाची ओळखच मुळात पारंपरिकतेशी जोडलेली आहे. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गावाकडे परततात. घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना होते आणि पुढील काही दिवस भक्तिमय वातावरणात आरती, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम रंगतात.

या आरतीच्या वातावरणात टाळ-मृदुंगासोबत ढोलकीचा ठेकाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात ढोलक्यांची मागणी अचानक वाढते. कोकणातील हीच गरज ओळखून उत्तर भारतीय कारागीर दरवर्षी आपली कला आणि तयार केलेली वाद्ये घेऊन येथे दाखल होतात.

ढोलकी तयार करण्यासाठी आंबा, शिसम, खैर, आईन यांसारख्या विविध प्रकारच्या लाकडाचा वापर केला जातो. लाकडाचा प्रकार, आकार आणि दर्जानुसार ढोलक्यांची किंमत ठरते. साधारण तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत विविध आकारांच्या ढोलक्या उपलब्ध आहेत.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असला, तरी या उत्सवाभोवती निर्माण होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा फायदा विविध राज्यांतील कामगार आणि कारागिरांना मिळतो. फुलवाले, सजावट साहित्य विक्रेते, मूर्तिकार, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासोबतच पारंपरिक वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरतो.

उत्तर भारतातील या कारागिरांसाठी कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आपल्या पारंपरिक कलेला ग्राहक मिळवून देणारी हक्काची बाजारपेठ झाली आहे. तीन पिढ्यांपासून सुरू असलेली ही ये-जा आजही कायम आहे. आधुनिक संगीताच्या काळातही घरगुती गणेशोत्सवातील पारंपरिक आरती आणि ढोलकीचा ठेका या कारागिरांच्या हाताला काम आणि त्यांच्या कलेला दाद देत आहे.

गणेशोत्सवात ढोलक्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी आम्ही उत्तर भारतातून कोकणात येतो. गावोगावी जाऊन ढोलक्या विकतो. उत्सव संपल्यानंतर पुन्हा गावी परततो. आमच्या कलेच्या माध्यमातून गणरायाची सेवा आणि आराधना करण्याची संधी मिळते, अशी भावना या कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे.