scorecardresearch

गडचिरोली: नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक

एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत मौजा भंगारामपेठा गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी तेलंगणामधून दामरंचा मार्गे छत्तिसगड येथे वाहतुक करीत असलेल्या ४ व्यक्तींकडून १० नग कार्डेक्स वायरचे ३५०० मीटर लांबीचे बंडल व इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.

गडचिरोली जिल्हयामध्ये नक्षलवादी घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या बनावटी शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात. नक्षल समर्थकांकडुन जप्त करण्यात आलेल्या कार्डेक्स वायरद्वारे नक्षली बनावटीचे बीजीएल, हँडग्रेनेड,  बॉम्ब आणि आयईडी तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात वापर केला जातो. येत्या टिसीओसी सप्ताहात या स्फोटकांचा नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार होता.

राजु गोपाल सल्ला, (वय ३१, करीमनगर, तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय २४, भंगारामपेठा ता. अहेरी), साधु लच्चा तलांडी (वय ३०), मोहम्मद कासिम शादुल्ला (रा. एनटीआर तामिल कॉलनी, बाबुपेठ, आसिफनगर, तेलंगणा), छोटु ऊर्फ सिनु मुल्ला गावडे (रा. भंगाराम पेठा ता. अहेरी) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी ४ आरोपींना घटनास्थळावरुन पकडण्यात आले असून एक आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडून शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात पार पडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या जवानांचे कौतुक केले आहे. तसेच नक्षलवाद्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणा­या नक्षलसमर्थकांवर कडक कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang of four supplying explosives to naxals arrested in gadchiroli hrc

ताज्या बातम्या