मोटारीतून आलेल्या अज्ञात चार ते पाच जणांपैकी एकाने दुकानासमोर बसलेल्या तरुणाच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या. या तरुणाने प्रसंगावधान राखल्याने तो बचावला. मात्र गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली असून येथील टोळीयुद्ध पुन्हा भडकल्याचे मानले जाते. नंतर बाभळेश्वर येथे पोलिसांनी नाकेबंदी करूनही हे हल्लेखोर पळून गेले, त्यांचा सायंकाळी पाठलाग सुरू होता.
बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास शिर्डी शहरातील कनकुरी रस्त्यावर ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी मोटारीतून फरार झाले. शिवाजी सोपान चौधरी (वय ३५, राहणार नांदुर्खी) हा तरुण कनकुरी रस्त्यालगत असलेल्या हॉटेलसमोरील त्याच्या दुकानाबाहेर खुर्ची टाकून बसला असताना मोटीतून आलेल्या अज्ञात चार ते पाच जणांपैकी दोघांनी जवळ जात त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावले. चौधरी याने प्रसंगावधान राखून आरोपीच्या हाताला धक्का दिला. यामध्ये चौधरी याच्या हाताला गोळी चाटून गेली. या झटापटीत हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले. त्या दोन मोकळ्या पुंगळ्या व पाच जिवंत काडतुसे पोलिसांना घटनास्थळी सापडली. गोळीबार केल्यानंतर अज्ञात चार ते पाच तरुण व्हेरिटो मोटारीतून फरार झाले. जखमी चौधरी हा शिर्डीतील एका टोळीचा सदस्य असल्याचे समजते.
घटना घडली त्या वेळी स्थानिक तरुण मदतीसाठी धावत आले. त्यांनी या अज्ञात आरोपींच्या गाडीवर दगडफेक केली. यामध्ये आरोपींच्या मोटारीची काच फुटली. या आरोपींनी शिर्डीमार्गे नगरकडे जाताना रस्त्यात पुन्हा गोळीबार केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले. पोलिसांनी तातडीने सर्वत्र नाकाबंदी करून गोळीबार करणा-या अज्ञात तरुणांचा शोध उशिरापर्यंत घेतला. सदर आरोपींनी गोळीबार केला. तेथील हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमे-यात ते चित्रबद्ध झाले आहेत. त्यामुळेच धागेदोरे मिळाले असून पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला होता. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.