परभणी : धनंजय मुंडे हे माझ्यावर सातत्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप करतात. या आरोपात कसलेही तथ्य नाही. तुम्ही मला नीरव मोदी म्हणत असाल तर धनुभाऊ तुम्ही विजय मल्ल्या आहात. विजय मल्ल्याने देशाला फसवले आणि तो कशाचा शौकीन होता हे सगळ्यांना माहित आहे अशी टीका गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली.

गंगाखेड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनी धुराळा उडाला आहे. गंगाखेड पालिकेच्या अध्यक्षपदासाठी माजीमंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी (अजीत पवार) पक्षाकडून रिंगणात आहेत. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला गुट्टे उत्तर दिले आहे.

गंगाखेड आणि परळीची तुलना होऊ शकत नाही. गंगाखेड संत जनाबाईचे जन्मस्थळ आहे. परळीला सुद्धा वैद्यनाथाचे मंदिर आहे पण परळी आणि बीड केवळ राज्यातच नाही तर देशात बदनाम झाले आहे. बीड, परळीला बदनाम कोणी केले ? धनुभाऊ ही तुमची आणि तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याची मेहरबानी आहे. ‘मर्डर’ तर तुमच्या हातचा मळ आहे. तुम्ही चुटकीसरशी ‘मर्डर’ करता. परळीमध्ये जेवढे मर्डर झाले त्यामागे धनुभाऊचीच माणसे होती. मर्डर झालेली माणसे धनुभाऊची आणि करणारीही धनुभाऊचीच असेही गुट्टे म्हणाले.

तुम्ही स्वतः ला गोपीनाथ मुंडे साहेबांचे वारस म्हणता पण त्यांना तुम्ही किती त्रास दिला आहे. साहेबांना किती मनस्ताप झाला असेल. हे तुम्ही एवढं केलं, तुम्हाला कुठेतरी फेडावं लागेल. मुंडे साहेब म्हणजे लबाडांचा सुभेदार असं धनुभाऊ म्हणाले होते. मग हे कोण आहेत ? हे तर सुभेदारांचे बाप आहेत. असाही आरोप गुट्टे यांनी केला. तुमच्यावर एवढे सगळे आरोप होत होते. तुम्हाला घेरले होते. तरीही मी तुमच्या विरोधात एक शब्द बोललो नाही. आणि आता तुम्ही इथे येऊन माझ्या विरोधात बोलता. असे म्हणत गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचा समाचार घेतला.

धनुभाऊ तुम्हाला लहानपणापासून ओळखतो. माझ्यासमोरच तुमचा जन्म झाला आहे. इंदोरमध्ये तुमचा मर्डर झाला असता. आज भय्यूजी महाराज आपल्यात नाहीत. भय्यूजी महाराजांनीच तुम्हाला वाचवलं. असा आरोपही गुट्टे यांनी मतदानापूर्वी जाहीर सभेत केला. विजय मल्ल्या मध्ये आणि तुमच्या मध्ये बरंच जुळतंय. त्यांना ज्या सवयी आहेत, त्याच तुम्हालाही आहेत. त्याच्यात आणि तुमच्यात काही फरक नाही धनुभाऊ. तुम्ही गंगाखेड मध्ये आलात मला परळीत यायला वेळ लागणार नाही. मी राजा माणूस आहे, मला बंधन नाही. कुणाच्याही स्टेजवर जाईल पण तुमचा निकाल लावीन असा विचारही यावेळी गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर सभेतून दिला. आपल्या संपूर्ण टीकेत गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख ‘धनुभाऊ’ असा केला.