scorecardresearch

सांगली : वीस लाखांचा गांजा जप्त, चौघा तस्करांना अटक

सांगलीसह परिसरात विक्रीसाठी गांजाची तस्करी करणार्‍या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून २० लाख ४० हजारांचा गांजा जप्त केला.

Ganja seized in sangli
वीस लाखांचा गांजा जप्त, चौघा तस्करांना अटक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : सांगलीसह परिसरात विक्रीसाठी गांजाची तस्करी करणार्‍या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी अटक करून २० लाख ४० हजारांचा गांजा जप्त केला. या तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारीही पोलिसांनी जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी आर्यन देशिंगकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्यासह पथकाने कवठेपिरान गावच्या हद्दीमध्ये आदिल नासीर शहापुरे (वय ३६, रा. कोल्हापूर रोड, सांगली) सचिन बाबासो चव्हाण (वय ३१ रा. कवठेपिरान), मयुर सुभाष कोळी (वय ३३ रा. शंभर फुटी सांगली) व मतीन रफिक पठाण (वय ३१ रा. राधाकृष्ण वसाहत सांगली) यांना गांजा तस्करी प्रकरणी अटक केली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची माती…”, १४ वर्षे तुरुंगात राहण्याची तयारी असल्याचं म्हणत नवनीत राणांचा हल्लाबोल!

गोपनीय माहितीनुसार दोघेजण गांजाची विक्री करण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना समजले होते. या माहितीच्या आधारे पथकाने कवठेपिरान ते सर्वोदय साखर कारखाना रस्त्यावर सापळा लावला होता. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची आणि इसमांची संशय आल्याने चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मोटारीची झडती घेतली असता मोटारीमध्ये १०२ किलो वजनाचा तयार गांजा मिळाला. इर्टिगा (एमएच १० बी ७८३३) आणि रिओ प्रिमीअर (एमएच १० बीएम ४५३४) या दोन मोटारींतून गांजा जप्त करण्यात आला. दोन्ही वाहनांसह २८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा – “शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती, कारण…”, बावनकुळेंचं थेट विधान!

या कारवाईमध्ये जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, अमोल ऐदळे, सचिन कनप, राहूल जाधव, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे, गौतम कांबळे, प्रविण शिंदे आदींनी सहभाग घेतला होता. गांजाची तस्करी केल्या प्रकरणी चौघाविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 22:37 IST
ताज्या बातम्या