सांगलीतील गणेश मंडळांचे विधायक पाऊल; ९ लाखांचा निधी

गणेशोत्सव हे समाजप्रबोधन चळवळीचे साधन आहे. या चळवळीच्या माध्यमातून उपलब्ध होणारी वर्गणी समाजविघातक ‘डॉल्बी’सारख्या साधनावर खर्च करण्यापेक्षा हा पसा जलयुक्त शिवारासाठी वर्ग करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने मांडली आणि यंदाच्या उत्सवात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, १३५ मंडळांनी ९ लाखांचा निधी जलयुक्त शिवारच्या उपक्रमास दिला.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी जिल्हय़ातील युवकांना भावनिक साद घातली. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी डॉल्बीचे दुष्परिणाम विशद केले. डॉल्बीवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेतून गणेशभक्ती करावी व अशा उत्सवामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे उपक्रम राबवावेत, अशी साद नांगरे पाटील यांनी घातली.

सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय िशदे यांनी तालुकास्तरावर बठका घेऊन हा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवला. जिल्हय़ातून १३५ मंडळांनी स्वत: होऊन एकूण रुपये ९ लाख १४ हजार २०४ जलयुक्त शिवारास निधी सुपूर्द केला आहे. विटा पोलीस ठाणेअंतर्गत १० गणेश मंडळांनी १ लाख २५ हजार रुपये निधी जमा केला. तर दुसऱ्या क्रमांकावर वाळवा तालुक्याने मजल मारली आहे. इस्लामपूर पोलीस ठाणे अंतर्गत केवळ २ गणेश मंडळांनी निधी जमा केला असला तरी ही रक्कम १ लाख १७ हजार रुपये आहे.

जिल्हय़ातील इतर ३ तालुक्यांनी जवळपास प्रत्येकी एक लाख रुपये निधी जमवण्यात यश मिळवले आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत ५ गणेश मंडळांनी १ लाख १९ हजार रुपये, शिराळा पोलीस ठाणे अंतर्गत ३५ गणेश मंडळांनी रक्कम ९० हजार रुपये, सांगली पोलीस ठाणे अंतर्गत ७ गणेश मंडळांनी ९० हजार रुपये निधी जमा केला आहे.

मिरज शहर पोलीस ठाणे अंतर्गत २ गणेश मंडळांनी ४३ हजार रुपये, पलूस पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी ४१ हजार १ रुपये, म. गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत ६ गणेश मंडळांनी ३४ हजार ५०० रुपये, कोकरूड पोलीस ठाणे अंतर्गत ८ गणेश मंडळांनी रक्कम ३४ हजार, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे अंतर्गत ५ गणेश मंडळांनी ३४ हजार रुपये, उमदी पोलीस ठाणे अंतर्गत ३० गणेश मंडळांनी २९ हजार ७०० रुपये, कडेगाव पोलीस ठाणे अंतर्गत २ गणेश मंडळांनी २७ हजार रुपये, कुरळप पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी २१ हजार रुपये, भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत २ गणेश मंडळांनी २० हजार रुपये, आष्टा पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी १७ हजार रुपये, आटपाडी पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १५ हजार रुपये, तासगाव पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १५ हजार रुपये, जत पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १५ हजार, कासेगाव पोलीस ठाणे अंतर्गत ३ गणेश मंडळांनी १२ हजार रुपये, विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने १० हजार रुपये, कुंडल पोलीस ठाणे अंतर्गत ४ गणेश मंडळांनी ९ हजार रुपये, सांगली शहर पोलीस ठाणे अंतर्गत एका गणेश मंडळाने ५ हजार रुपये निधी जमा केला आहे.