Ganpatipule Budget Hotels and pocket-friendly homestays : कमी बजेट आणि कमी दिवसांत जर मस्त कोकण फिरून यायचं असेल, तर गणपतीपुळे हा सर्वांत बेस्ट ऑप्शन आहे. मुंबई आणि पुण्याहून तिथे थेट जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून गणपतीपुळे अवघ्या ५० किमी अंतरावर असल्याने रेल्वेने प्रवास करणेही अतिशय सोपे पडते.

आता गणपतीपुळेला कसं जायचं आणि काय पाहायचं, हे सर्व ठरवून झालं असेल; पण ‘राहायचं कुठे?’ हा प्रश्न अजून सुटला नसेल, तर काळजी करू नका! येथील सर्वांत बजेट फ्रेंडली स्टे कुठे आहे आणि तो कसा बूक करायचा, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मुक्कामासाठी सर्वोत्तम पर्याय: ‘भक्त निवास’

गणपतीपुळेला गेल्यावर राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असेल, तर ‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ यांचे भक्त निवास हा सर्वांत सोपा आणि खिशाला परवडणारा पर्याय आहे. अवघ्या ७०० ते १००० रुपयांमध्ये तुम्ही इथे अगदी बिंधास्त राहू शकता.

भक्त निवासाचे नियम आणि अटी:

चेक-इन आणि चेक-आऊट: सकाळी ११:०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९:०० वाजेपर्यंत.

मर्यादा: तुम्ही येथे जास्तीत जास्त २ दिवस (रात्री) राहू शकता.

ओळखपत्र: बुकिंग आणि चेक-इनच्या वेळी वैध ओळखपत्र देणे अनिवार्य आहे.

मर्यादा: डॉर्मिटरीमध्ये फक्त एकाच व्यक्तीला राहण्याची परवानगी असते. कोणत्याही रुमला कोणतीही रूम सर्व्हिस दिली जात नाही.

महत्त्वाचे नियम: भक्त निवास परिसरात मद्यपान आणि मांसाहारी जेवणाला सक्त मनाई आहे. तसेच, हे भक्तनिवास पेट-फ्रेंडली (पाळीव प्राण्यांसाठी) नाही.

मुलांसाठी नियम: १२ वर्षांखालील मुलांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, मात्र त्यावरील वयाच्या मुलांसाठी शुल्क आकारले जाईल.

खोल्यांचे प्रकार आणि दर (प्रति रात्र):

२ बेड नॉन-एसी (विथ गॅलरी): ₹७००/-

२ बेड एसी: ₹८००/-

३ बेड (विथ गॅलरी): ₹१,०००/-

ऑनलाइन बुकिंग कसे करावे?

जर तुमचे प्लॅनिंग पक्के झाले असेल, तर तुम्ही घरबसल्या ‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ च्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट देऊन बुकिंग करू शकता.

१. संकेतस्थळावर जाऊन तुमची चेक-इन आणि चेक-आऊट तारीख व वेळ निवडा.
२. तुम्हाला किती खोल्या हव्या आहेत आणि तुमच्यासोबत किती व्यक्ती आहेत, ही माहिती भरा.
३. त्यानंतर बाजूला असलेल्या ‘Check Availability’ वर क्लिक करा.
४. तिथे क्लिक करताच तुम्ही निवडलेल्या तारखेला रूम्स उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्ही बुकिंग पूर्ण करू शकाल.