रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या घरगुती गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या तुटवड्याचा थेट परिणाम आता जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावरही होऊ लागला आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे येथेही गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. गणपतीपुळे देवस्थानाने गॅस उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद बंद केला आहे. तसेच भाविकांसाठी दिला जाणारा खिचडी प्रसादही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे हजारो भाविक आणि पर्यटकांना प्रसादापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

दरम्यान, गॅस उपलब्ध नसल्याने परिसरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटन6 हंगामाच्या ऐन काळातच ही समस्या निर्माण झाल्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पर्यटकांना आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत तर ते इतर पर्यटनस्थळांकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर पर्यटकांनी पाठ फिरवली, तर स्थानिक रोजगारावर परिणाम होऊन बेकारी वाढण्याची आणि जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती उपाययोजनांची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला यावर्षी मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी गणपतीपूळे येथे गणेशाच्या दर्शनासाठी येत असतो. पुणे येथून प्रवास करीत इथे पोहचत असतो. मंदिरात आल्यावर मन प्रसन्न होते. येथील लाडू व खिचडी प्रसाद खाल्ल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो. मात्र आता येथील प्रसाद बंद झाल्यास तो आनंद मिळणार नाही, याची खंत कायम राहणार आहे. – राजाराम महाडिक, पुणे, शिवाजीनगर