Planning a Ganpatipule Weekend Trip during summer holidays : मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत. पण त्यांना कुठेच फिरायला नेलं नाही? आणि तुम्हालाही लाँग विकेंड मिळाला आहे? मग जवळपासच कुठेतरी जाण्याचा प्लान करताय? पण कळत नाहीय, कुठे जायचं? मग आम्ही आहोत ना… मन रमेल आणि छान वाटेल अशा ठिकाणी फिरून यायचं आहे का? अशा वीकेंडसाठी ‘गणपतीपुळे‘ हे एक उत्तम ठिकाण ठरेल. गणपतीपुळे येथील गणपती मंदिराव्यतिरिक्त तुम्हाला येथे काय काय फिरायचं माहीत नसेल तर आम्ही आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांविषय़ी माहिती देत आहत.

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे कोकण किनारपट्टीवरील अत्यंत सुंदर आणि शांत पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण धार्मिक महत्त्व आणि निसर्गसौंदर्य यांचा उत्तम संगम आहे. ४०० वर्षे जुने स्वयंभू गणेश मंदिर आणि पांढऱ्या वाळूच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. मुंबई-पुण्यापासून गणपतीपुळेला कसं जायचं? कुठे राहायचं? काय खायचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय काय पाहायचं? हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण नक्की वाचा.

गणपतीपुळे येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

खरंतर गणपतीपुळेला जाण्यासाठी जून ते ऑगस्ट हा पावसाळ्याचा काळ सर्वोत्तम मानला जातो, कारण पावसात कोकण अधिक हिरवेगार आणि विहंगम दिसते. परंतु, पावसाळ्यात वॉटर स्पोर्ट्स बंद असतात. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम असल्याने गणपतीपुळेला पर्यटकांचा ओढा वाढला आहे, त्यामुळे कौटुंबिक सहलीसाठी हा काळही अत्यंत योग्य आहे.

मुंबई-पुण्याहून गणपतीपुळेला कसं जाल?

  • स्वतःच्या गाडीने: जर तुमची स्वतःची गाडी असेल तर हा सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण मुंबई किंवा पुण्यातून हा प्रवास केवळ ७ ते ८ तासांचा आहे.
    • मुंबई ते गणपतीपुळे मार्ग: NH66 मार्गे पनवेल – महाड – चिपळूण – रत्नागिरी – गणपतीपुळे.
    • पुणे ते गणपतीपुळे मार्ग: सातारा – कराड – पाटण – कुंभार्ली घाट – चिपळूण – गणपतीपुळे.
  • एसटी आणि खाजगी बस: मुंबई, पुणे आणि कोल्हापूरवरून थेट राज्य परिवहन (ST) आणि खाजगी लक्झरी बसेस उपलब्ध आहेत.
  • ट्रेनने: कोकणात जाणाऱ्या कोणत्याही ट्रेनने तुम्ही रत्नागिरी स्टेशनपर्यंत पोहोचू शकता. तिथून गणपतीपुळे साधारण ५० किमी अंतरावर आहे. स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी, रिक्षा किंवा बसने अवघ्या ४५ मिनिटांत गणपतीपुळेला पोहोचू शकता.

गणपतीपुळेला जाऊन कुठे राहाल?

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC Resort) रिसॉर्ट येथे समुद्रकिनाऱ्यालगतच उपलब्ध आहे. इथली बांबू कॉटेजेस खूप छान असून तिथून समुद्राचा अप्रतिम ‘सी व्ह्यू’ दिसतो. याव्यतिरिक्त, मंदिराच्या भक्तनिवासात किंवा अनेक खाजगी हॉटेल्स व होमस्टेमध्ये तुमच्या बजेटनुसार राहण्याची उत्तम सोय होते.

कोकणात गेल्यावर काय खायचं?

कोकणात आल्यावर येथील प्रसिद्ध उकडीचे मोदक, सोलकढी आणि कोंबडी वडे (मांसाहारी पर्यटकांसाठी) आस्वाद नक्की घ्या. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत हापूस आंबा आणि करवंदांचं सरबत मिळणारे स्टॉल्स जागोजागी पाहायला मिळतात.

गणपतीपुळे आणि आसपास काय काय पाहाल?

  • १. स्वयंभू गणेश मंदिर: रात्रीचा प्रवास करून सकाळी गणपतीपुळेला पोहोचलात की, आधी समुद्रकाठी वसलेल्या या स्वयंभू मंदिराला भेट द्या. हे येथील मुख्य आकर्षण असून, गणेशाची मूर्ती स्वयंभू आणि पश्चिममुखी आहे. मूर्तीचे मुख पश्चिमेकडे (समुद्राकडे) असल्याने या मंदिराला ‘पश्चिम द्वार देवता’ असेही म्हणतात. येथे संपूर्ण डोंगरालाच गणपतीचे रूप मानले जाते, त्यामुळे भाविक मंदिराभोवती प्रदक्षिणा न घालता संपूर्ण डोंगराची प्रदक्षिणा घालतात.
  • २. गणपतीपुळे समुद्रकिनारा : मंदिराला लागूनच हा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. येथील पांढरी वाळू आणि स्वच्छ निळे पाणी पर्यटकांना आकर्षित करते. किनाऱ्यावर नारळी-सुपारीच्या बागा आहेत. येथे तुम्ही उंट सवारी, घोडागाडी आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
  • ३. प्राचीन कोकण संग्रहालय: हे मंदिराच्या जवळच असलेले एक खुले (Open-air) संग्रहालय आहे. येथे पर्यटकांना जुन्या काळातील कोकणचे ग्रामीण जीवन, संस्कृती, व्यवसाय आणि इतिहास यांची माहिती हुबेहूब पुतळ्यांच्या माध्यमातून दिली जाते. येथे कोकणी हस्तकलेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थही खरेदी करता येतात.
  • ४. आरे वारे समुद्रकिनारा: गणपतीपुळेपासून अवघ्या १०-१२ किमी अंतरावर हा जुळा किनारा (Twin Beaches) आहे. रत्नागिरीकडून गणपतीपुळेला येताना लागणारा आरे वारे घाट रस्ता अत्यंत निसर्गरम्य आहे. फोटोग्राफीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
  • ५. जयगड किल्ला आणि दीपगृह : गणपतीपुळेपासून सुमारे २० किमी अंतरावर शास्त्री नदीच्या संगमावर हा ऐतिहासिक किल्ला आहे. जयगड दीपगृहावरून अरबी समुद्राचे आणि खाडीचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
  • ६. केशवसूत स्मारक, मालगुंड: आधुनिक मराठी कवी ‘केशवसूत’ (कृष्णाजी केशव दामले) यांचे हे जन्मस्थान आणि स्मृतिस्थळ आहे. हे स्मारक गणपतीपुळेपासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या मालगुंड या गावी आहे. लिटरेचर प्रेमींसाठी ही उत्तम जागा आहे.
  • ७. पूर्णगड: पूर्णगड हा मुचकुंदी नदीच्या खाडीवर आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला एक लहान, छुपा आणि निसर्गरम्य सागरी किल्ला आहे. हा किल्ला रत्नागिरी शहरापासून दक्षिण दिशेला सुमारे २५ किमी अंतरावर (आणि गणपतीपुळेपासून ४५ किमी) आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळ ‘पावस’ पासून हे केवळ १० किमी अंतरावर आहे.

महत्त्वाच्या टीप्स

तुम्ही येथे वॉटर स्पोर्ट्स करणार असाल तर अधिकृत एमटीडीसी समोरील ठिकाणाहूनच करा. तसंच, कोकणात नेटवर्कची खूप मोठी समस्या असते. त्यामुळे गुगल पेसारख्या ऑनलाईन पेमेंटला अडचण येऊ शकते. त्यामुळे शक्यता स्वतःसोबत कॅश ठेवा.