कर्नाटकातील जंगली हत्ती महाराष्ट्रात दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, बाबरवाडी दशक्रोशीत सध्या असून नारळ, सुपारी बागायतीसह शेतीचे प्रचंड नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. वनखात्याने कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली आहे.

हेवाळेचे सरपंच संदीप देसाई यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन वनखात्यासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले आहे. कर्नाटक दांडेली अभयारण्यातील हत्ती हेवाळे, बाबरवाडी भागात दाखल झाले आहेत. या हत्तींचा पाच जणांचा कळप आहे. एकटय़ा हेवाळे गावातील सुमारे १ हजार नारळाच्या झाडांचे नुकसान या हत्तींनी केले आहे. नारळ, सुपारी, केळी अशा फळबागासह शेतीचे नुकसानदेखील हत्ती करत आहेत.

या जंगली हत्तींना कायमचे कर्नाटकात पाठवून शेतकऱ्यांना वाचवा, असे आवाहन सरपंच संदीप देसाई यांनी केले आहे. मनुष्य वस्तीत हत्ती आले असून शेतकऱ्यांचा पाठलागही करत आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, असे सरपंच संदीप देसाई यांनी म्हटले आहे.

शेती-बागायती हत्ती व वन्य प्राण्यांसून वाचवा असे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीत आपली गुंतवणूक केली असून हत्ती व वन्य प्राण्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. वनखात्याची नुकसान भरपाईदेखील महागाईच्या काळात तुटपुंजीच असल्याचे सांगण्यात येत आहे. या जंगली हत्तींना हेवाळे, बाबरवाडी, तिलारी आणि कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातून परत कर्नाटक दांडेली अभयारण्यात पाठविण्याची मागणी शेतकरी, बागायतदार करत आहेत.