हिंगोली : घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून केवळ पाच दिवसांत १६५ ठिकाणी छापे टाकून ३३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत असून, पुढील काही दिवसांत तपासणी अधिक तीव्र केली जाणार आहे.
आखाती देशांतील युद्धपरिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र असताना नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी पाच तालुक्यांसाठी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. या पथकांमार्फत घरगुती सिलेंडरचा गैरवापर रोखण्यावर भर देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, खानावळ, हॉटेल व ढाब्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत होत्या. त्यानुसार १६ मार्च रोजी ४८ ठिकाणी छापे टाकून २१ सिलेंडर जप्त करण्यात आले, तर १७ मार्च रोजी ४३ ठिकाणी कारवाई करत ६ सिलेंडर जप्त करण्यात आले. २० मार्च रोजी १६ ठिकाणी तपासणी झाली मात्र गैरवापर आढळला नाही. पुढे २४ मार्च रोजी ३३ ठिकाणी छापे टाकून २ सिलेंडर, तर २५ मार्च रोजी २५ ठिकाणी कारवाई करून ४ सिलिंडर जप्त करण्यात आले.
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा रुग्णालयांना प्राधान्याने देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात ग्रामीण भागातील हॉटेल्स व खानावळींवर विशेष लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम अधिक वेगाने राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी दिली.
