पनवेल – कामोठा सेक्टर ३४ परिसरात सुरू असलेल्या जलवाहिनीच्या खोदकामादरम्यान गॅस वाहिनीला धक्का लागून वायू गळतीची घटना गुरूवारी सायंकाळच्या सूमारास घडली. काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी अग्निशमन दल, पोलीस आणि गॅस कंपनीच्या आपत्कालीन पथकाने तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणत संभाव्य मोठा अनर्थ टाळला.

कामोठे येथील सेक्टर ३४ येथे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना यंत्राने महानगर गॅसच्या वाहिनीला धक्का लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कामोठा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बीडवे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित परिसर सील करत गॅस गळतीच्या ठिकाणाजवळील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले.

दरम्यान, पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आवश्यक ती उपाययोजना सुरू केली. महानगर गॅस कंपनीच्या आपत्कालीन पथकानेही तातडीने प्रतिसाद देत गळती रोखण्यासाठी तांत्रिक काम सुरू केले. काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाच्या जलद आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले.

दरम्यान, खोदकामादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित होत आहे. या घटनेनंतर पनवेल महापालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रविण बोडखे यांनी संबंधित घटना घडली असून तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली.