लोकसत्ता ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून
मुंबई : इराण-इस्त्रायल युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. राज्यात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच युद्ध आणखी आठवडाभर सुरू राहिले तर पेट्रोल-डिझेल मिळणे अवघड होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एलएनजी’, ‘एलपीजी’ , ‘मिथेनॉल’ आणि ‘पिचिंग आईल’ याचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर वाहन उद्योगासह औषधी निर्माण बंद पडेल. बहुतांश कंपन्यांमध्ये केवळ दोन दिवसांचा पुरवठा शिल्लक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सरकारने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
राज्यातील हॉटेल व्यवसायासाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाला आहे. युद्ध आणखी आठवडाभर सुरू राहिले तर पेट्रोल-डिझेल मिळणे अवघड होणार आहे. मुंबईत सुमारे ५३ लाख वाहने आहे. सध्या सीएनजी – पीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला नसला तरी कपात होण्याची शक्यता असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले.
सीएनजी अभावी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडेल. मुंबई, ठाणे, नवी मंबई, पनवेलसह उरणमध्ये महानगर गॅस लिमिटेडतर्फे पीएनजीचा पुरवठा केला जातो. सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक घरगुती आणि ५ हजार ६०० छोट्या व्यावसायिक – औद्योगिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस वापरला जातो. याशिवाय १२ लाखांपेक्षा जास्त वाहने सीएनजीवर धावतात. एमजीएलकडून ग्राहकांना गॅस पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता असल्याची अटकळ आहे. सध्या एमजीएलला गॅस उपलब्धतेत कोणतीही कपात करावी लागलेली (पान ८ वर) (पान १ वरून) नाही. एमजीएलच्या कार्यक्षेत्रात सीएनजी आणि पीएनजी पुरवठा सुरळीतआहे. एमजीएलला घरगुती पुरवठा पूर्ण करण्यासाठी आवश्यक १०० टक्के गॅस देशांतर्गत उत्पादित गॅसमधून मिळतो. त्याचप्रमाणे सीएनजी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेला बहुतांश गॅस देखील देशांतर्गत उत्पादित केला जातो.
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांना चिंता
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांसाठी साधारणत: २४० मेट्रीक टन गॅस पुरवठा लागतो. सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातील दहा कंपन्यांचे कामकाज पूर्णत: थांबले आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चर या औद्योगिक संघटनेच्या वतीने अपुर्या इंधन पुरवठ्यामुळे औद्योगिक उत्पादनावर होणारे परिणाम किती याची चाचपणी करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अनेकांनी फार तर दोन दिवसांपर्यंतचा इंधनसाठा शिल्लक असल्याचे सांगितले.
विदर्भातील उद्योगांकडे पाच दिवसांचाच गॅससाठा
नागपूर : युद्धाचे परिणाम विदर्भातील उद्योगांवर होण्याची चिन्हे दिसत आहे. पाच दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा उद्योगांकडे असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
फाउंड्री इंजिनीअरिंग उद्योगासाठी अनेक घटक आयात करावे लागतात. बंदरावर ते उतरून घेण्यासाठी प्रति कंटेनर दोन ते तीन लाख रुपये युद्ध अधिभार म्हणून अधिकचे मोजावे लागत असल्याने त्याचा फटका बसत आहे. या उद्योगातून होणार्या निर्यातीवरही लक्षणीय परिणाम झाला आहे. कच्च्या मालाच्या उपलब्धतेतील चढउतार, वाढलेली लॉजिस्टिक्स किंमत, निर्यात बाजारपेठेतील अनिश्चितता, उत्पादन नियोजन आणि पुरवठा साखळी स्थिरतेवर परिणाम होत आहे. – महेश दाते, पश्चिम प्रदेश सचिव, द इ्स्टिटट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन
फाऊंड्री उद्योगाला फटका
औद्योगिक गॅस पुरवठा जवळपास ठप्प झाल्याने फाउंड्री, इंजिनीअरिंग उद्योगातील प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूरसह राज्य, देशातील उद्योगांना झळ बसली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुमारे ५०० वर फाउंड्री, इंजिनीअरिंग उद्योग असून त्यामध्ये दरमहा पावणे दोन लाख टन कास्टिंग तयार केले जाते. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २५ हजार कामगारांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० उद्योग आहेत. यातील ९० टक्के उद्योगाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहेच. दोन किंवा तीन दिवस पुरेल एवढाच इंधनसाठा असल्याने उद्योगासमोर एक मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर मोठे नुकसान होईल. – उत्सव माचर, अध्यक्ष, सीएमआयए
तीन सदस्यीय समिती
पश्चिम आशियातील संघर्ष लक्षात घेता घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्या संदर्भात तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती गॅस पुरवठ्यातील अडचणी तसेच हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या समितीमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशेन (आयओसी ) हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियन कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)च्या कार्यकारी संचालकांचा समावेश आहे.
दोन दिवसांपासून होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. अनेक जहाजे समुद्रात अडकली आहेत. रशियाकडून इंधन पुरवठा सुरू आहे. परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे युद्ध जर आणखी आठवडाभर सुरू राहिले, तर पेट्रोल-डिझेलची समस्या निर्माण होईल. – रवी शिंदे, माजी अध्यक्ष, पेट्रोल डीलर असोसिएशन, मुंबई.
‘एलपीजी’चे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : इराणविरोधातील इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशातील ‘एलपीजी’ गॅसपुरवठ्यातील तुटवडा नियंत्रित करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. ‘एलपीजी’चे देशांतर्गत उत्पादन वाढवून घरगुती ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
