Gautami Patil Dahi Handi : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने ठाण्यातील शारदा दहिहंडी उत्सवात हजेरी लावत उपस्थित प्रेक्षकांचं मन जिंकलं. या वेळी तिने मुंबईकरांबद्दल असलेल्या तिच्या भावना व्यक्त करत उपस्थितांशी थेट संवाद साधला. आय लव्ह मुंबईकर असं लिहिलेल्या ब्लाऊजनेही आज लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत तिने मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होत गौतमी पाटील म्हणाली, “दहीहंडी म्हटलं की मुंबईच असते. या व्यतिरिक्त मी दुसरं काही पाहत नाही. मी इथल्या प्रेक्षकांबरोबर हा सण खूप एन्जॉय करते. आय लव्ह मुंबईकर! माझे मुंबईवर खूप प्रेम आहे.”

गौतमी पाटीलने कधी दहीहंडी खेळली आहे का? कधी थरावर चढली आहे का? असा प्रश्नही तिला यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत तिने सांगितले, “मी खरं सांगू तर आधी गावाकडे होते, तेव्हा कधीच असा सण एन्जॉय केला नाही. पण आता मी दहीहंडी खूप मनापासून एन्जॉय करते.” या उत्सवात मिळणाऱ्या महिलांच्या प्रतिसादाबद्दल बोलताना ती म्हणाली की, महिलांकडून जे प्रेम मिळतं, ते पाहून खूप छान वाटतं. सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद असेच सतत मिळत राहावे, हीच माझी इच्छा आहे.

यावेळी तिने चाहत्यांना सुरक्षेचे आवाहनही केले. “गोविंदांनो, जोशात स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका, स्वतःची पूर्ण काळजी घ्या,” अशा शब्दांत तिने उपस्थितांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. गौतमीच्या या उपस्थितीमुळे शारदा दहिहंडी उत्सवात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. कृष्णा पाटील यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासह गौतमी पाटील आणखी अनेक ठिकाणी आज जाणार आहे.

डीजेबंदीवर काय म्हणाली गौतमी पाटील?

दरम्यान, विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या डीजेबंदीच्या मुद्द्यावरही गौतमी पाटीलला आज प्रश्न विचारण्यात आला. सण-उत्सव व्यवस्थित सारे केले पाहिजे. सण-उत्सव कसे साजरे व्हायला हवेत, कलाकार म्हणून तुमचं मत काय? असा प्रश्न गौतमी पाटीलला विचारण्यात आला. मात्र, तिने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.