Gautami Patil Lavni Video Raj Thackerys MNS Writes Letter Demands Strict Action Or Will Break Mantralaya glasses | Loksatta

गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र

Gautami Patil Viral Lavni Video: कंबरेच्या खाली नेसलेली साडी, अंगविक्षेप, गलिच्छ हावभाव या सगळ्याला टार्गेट करून महाराष्ट्रातील अनेक लावणी कलाकार, नेटकरी यांनी आजवर गौतमीवर टीका केली आहे.

गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा नाहीतर गृह मंत्रालयाच्या काचा…मनसेने कठोर शब्दात पाठवलं पत्र (फोटो: ट्विटर)

Gautami Patil Viral Lavni Video: गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरलं आहे. २०२२ च्या दहीहंडी सणाला एका कार्यक्रमात गौतमीने लावणी केली आणि आता वर्ष संपत आलं तर गौतमीच्या नावाची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे. लावणीच्या नावावर अश्लील हातवारे व हावभाव करण्यावरून गौतमी पाटील विरुद्ध वाद सुरु झाला. कंबरेच्या खाली नेसलेली साडी, अंगविक्षेप, गलिच्छ हावभाव या सगळ्याला टार्गेट करून महाराष्ट्रातील अनेक लावणी कलाकार, नेटकरी यांनी आजवर गौतमीवर टीका केली आहे. आता याच वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्यांनी गौतमी पाटीलला आळा घातला नाही तर गृहमंत्रालयाच्या काचा फोडू असा इशारा दिला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. १० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. पुण्यातील लोणी काळभोर येथील दहीहंडी दरम्यान रिल्स स्टार गौतमी पाटील या तरुणीने अश्लील डान्सनंतर गौतमी पाटील चर्चेत आली होती. यानंतर मिरज येथील एका कार्यक्रमात गौतमीचा नाच पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

गौतमी पाटीलच्या विरुद्ध मनसेने जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात मनसेने एक पत्र पाठवलं आहे.

मनसेने पत्रात नेमकं काय लिहिलंय?

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात. मात्र अभिनेत्री गौतमी पाटील ही हेतू पुरस्पर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे. याचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन व अश्लीलरित्या अंग प्रदर्शन करून हावभव करत आहे. यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतेचं वातावरण निर्माण होत आहे. याचे वाईट परिणाम राज्यातील तरुणांवर होत आहे. म्हणून गौतमी पाटील हिच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी व महाराष्ट्रतृातील गुणी कलाकर यांच्या नावाला कलंक लावू नये, ही विनंती. असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान गौतमी पाटीलच्या विकृत डान्सवर कारवाई न झाल्यास गृह मंत्रालयाच्या काचा फोडण्यास मागे पुढे पाहणार नाही असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी दिला आहे.

हे ही वाचा<< गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा

हे ही वाचा<< गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”

सुरेखा पुणेकर व मेघा घाडगेनेही केली होती टीका

गौतमीच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरून, तिच्या अंगप्रदर्शनावरून काही दिवसांपूर्वी लावणी कलाकार मेघा घाडगेने सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून टीका केली होती. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सुद्धा गौतमीवर टीका करत अशा लोकांनी स्वतःला कलाकार म्हणवून घेता कामा नये,यांना महाराष्ट्रभर थारा द्यायला नको अशी भूमिका घेतली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 20:57 IST
Next Story
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप