सावंतवाडी: स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला गेळे (ता. सावंतवाडी) येथील कबुलायतदार गावकार जमीनप्रश्न अखेर निकाली निघाला आहे. शुक्रवारी आयोजित एका विशेष कार्यक्रमात २३० हून अधिक खातेदारांना त्यांच्या हक्काचे सातबारे वितरीत करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणानिमित्त गावात आनंदाचे वातावरण पसरले होते.

​माजी मंत्री,आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते हे सातबारे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, “गेळे गावाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे. ग्रामस्थांना पर्यटनाचा लाभ घेता यावा यासाठी प्रत्येकी ५ गुंठे जागा पर्यटन विकासासाठी देण्यात आली असून, उर्वरित ५० गुंठे जागा शेतीसाठी राखून ठेवण्यात आली आहे. रत्नसिंधू योजनेतून या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, आंबोली आणि चौकुळ येथेही याच धर्तीवर जमीन वाटपाची प्रक्रिया राबवली जाईल.”

गावची जमीन मोजणी करून नकाशा तयार करण्यात आला आणि २८८ हेक्टर क्षेत्रातील २३० हून अधिक खातेदारांना न्याय देण्यात आला. या प्रक्रियेत विशेष योगदान देणाऱ्या संदीप गावडे व आरती गावडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी यावेळी ग्रामस्थांचे अभिनंदन करत, शासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातूनच हा गुंतागुंतीचा प्रश्न सुटू शकला, असे नमूद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच सागर ढोकरे यांनी केले.

​या सोहळ्याला प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार श्रीधर पाटील, पं.स. सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे पिढ्यानपिढ्या जमिनीच्या मालकी हक्कापासून वंचित असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.