आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
“तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती”
“तुम्ही माझ्यावर नेहमीच खूप प्रेम करता. हे प्रेम असेच उदंड राहणार आहे, याची मला खात्री आहे. हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहू द्या. तुमचे हे प्रेमच माझी उर्जा असणार आहे. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. अजित पवार यांच्यावर तर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रेम करता. ते तर तुमचेच आहेत. मी तुमची सून असूनही मला तुम्ही जीव लावला. याला उतराई होण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. बारामतीकर, काटेवाडीकर येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी अजित पवार सतत प्रयत्न करत असतात. इथून पुढेदेखील त्यांचा हाच प्रयत्न राहील,” अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.
“तुम्ही मला संधी द्याल, अशी आशा बाळगते”
“अजित पवार यांना अशीच साथ देण्याची गरज आहे. भविष्यातही तुम्ही ही साथ देणार, याची मला खात्री आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी मलाही खूप प्रेम दिलेलं आहे. त्यातून उतराई होण्यासाठी तुम्ही मला संधी द्याल, अशी अशा बाळगते,” असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत?
दरम्यान, बारामती मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवतो. मात्र यावेळी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरल्यास या जागेवर कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. कारण या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली तरी येथे प्रत्यक्ष सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण-भावातच खरी लढाई असणार आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.