अकोले: अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या वीजनिर्मिती क्षमतेत ५० टक्क्यांची वाढ होणार आहे. २५० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी १२५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता ३७५ मेगावॉट होणार आहे.
घाटघरचा हा जलविद्युत प्रकल्प पंप स्टोरेज स्वरूपाचा आहे. या प्रकल्पात पाण्याचा पुनर्वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. घाटघर जलविद्युत प्रकल्पात अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर ( ता. अकोले) येथे प्रवरा नदीवर उर्ध्व धरण असून ठाणे जिल्ह्यातील चोंडे (ता. शहापूर) येथे शाई नदीवर निम्न धरण आहे. कोकणकड्याजवळ डोंगराच्या पोटात भुयारांतर्गत विद्युतगृह असून तेथे प्रत्येकी १२५ मेगावॉट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे २५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते.
उर्ध्व धरणातील पाणी दाब बोगद्यातून वीजगृहापर्यंत नेले जाते. वीजनिर्मिती नंतर बाहेर पडणारे पाणी निम्न धरणात साठविले जाते. रात्रीच्यावेळी जेव्हा विजेची मागणी कमी असते तेव्हा उपलब्ध असणाऱ्या अतिरिक्त विजेचा वापर निम्न धरणातील पाणी वीजगृहातील जनित्रांचा उलटमार्गी पंप म्हणून उपयोग करून उर्ध्व धरणात सोडले जाते. विजेची मागणी जास्त असतानाचे काळात वीजनिर्मिती करणे हा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
घाटघर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात १२५ मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजनको) आणि सतलज जलविद्युत निगम यांची संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या दोन्ही संस्थांमधील सामंजस्य कराराप्रमाणे ही कंपनी ५ हजार मेगावॉट क्षमतेच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचा विकास करणार आहे. या संयुक्त कंपनीद्वारे पहिल्या टप्प्यात ७३५ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यात घाटघर टप्पा २ उदंचन जलविद्युत प्रकल्प,(१२५ मेगावॉट), निम्नवर्धा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प ( ५०५ मेगावॉट) व इराई तरंगता सौरऊर्जा प्रकल्प (१०५ मेगावॉट) या प्रकल्पांचा समावेश आहे.
या प्रस्तावित घाटघर प्रकल्पासाठी बिगरसिंचन मोठ्या प्रमाणात वाढीव पाण्याचा हक्क प्रस्तावास जलसिंचन विभागाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. त्यानुसार ०.०८७८ दशलक्ष घनमिटर पाणी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहे तसेच पहिल्या वर्षी एकवेळचा भरणा करण्याकरिता व पुनर्भरणासाठी आवश्यक पाणी पावसाळ्यात येणाऱ्या अतिरिक्त येव्यामधून वापरण्यात येणार आहे.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी जलसंपदा विभागाने याबाबत शासन आदेश जारी केला. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील २०० मेगावॉट क्षमतेच्या सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पाबाबतही सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
