अकोले: अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या घाटघरच्या पावसाने आज, मंगळवारी चार हजार मिमीचा टप्पा ओलांडला. भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून पावसाचा जोर वाढल्यामुळे तुडुंब भरलेल्या भंडारदरा व निळवंडेच्या विसर्गात आज वाढ करण्यात आली आहे.मुळा पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच असून मुळा धरण ९० टक्के भरले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून या वर्षी उशिरा दाखल झाला. पण मान्सून सक्रीय झाल्यानंतर जूनच्या शेवटी सुरू झालेला पाऊस ऑगस्टच्या मध्यानंतरही सुरूच आहे. आज ७५ मिमी पावसाची नोंद झालेल्या घाटघर येथे एक जूनपासून आजपर्यंत ४ हजार ७५ मिमी पाऊस पडला आहे.

रतनवाडी येथे आज ८२ मिमी पावसाची नोंद झाली. तेथे आजपर्यंत ३ हजार ४४३ मिमी पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणचा आजचा आणि आज पर्यंत पडलेला पाऊस मिमीमध्ये पुढील प्रमाणे आहे. पांजरे ५७ (२ हजार ६२६), भंडारदरा ४६ (२ हजार ३२०), वाकी ४१ (१ हजार ९४९), निळवंडे ६ (९१७), अकोले १ (४३९), आढळा धरण २ (३१०).

पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पाणलोट क्षेत्रातील धबधबे पुन्हा जोमाने कोसळत असून ओढे नाले तुडुंब भरून वहात आहेत. धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली. आज सकाळी भंडारदरा धरणातून ३ हजार १३५ क्युसेक विसर्ग सुरू होता.११ हजार ३९ दलघफु क्षमता असणाऱ्या धरणातील पाणीसाठा सकाळी ११ हजार दलघफू होता.

निळवंडे धरणाच्या विसर्गातही मोठी वाढ करण्यात आली असून सकाळी धरणातून ६ हजार ९०४ क्युसेक विसर्ग सुरू होता. प्रवरा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. ८ हजार ३२० दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण जवळपास पूर्ण भरले असून सायंकाळी धरणाचा पाणी साठा ८ हजार २७१ दलघफू होता.जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असणारे मुळा धरण ९० टक्के भरले आहे.आज सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार ५९० दलघफू (९०.७३ टक्के) झाला होता. धरणाच्या पाणी साठ्यात आज ४१० दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडली.

कोतुळजवळ सकाळी मुळा नदीचा विसर्ग ४ हजार ७०५ क्युसेक होता. तालुक्यात असणारे चौदा लघुतलाव तुडुंब भरून वहात आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात वातावरण पावसाळी असले तरी पाऊस नाही.