Ghatkopar Landslide News: मुंबईतील घाटकोपर येथे मध्यरात्री चिराग नगर येथील गौशिया चाळीवर दरड कोसळली. डोंगरावरून दरड कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून आतमध्ये अनेकजण अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जातेय. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्यरात्री सर्वजण साखरझोपेत असताना नेमकं काय घडलं याबाबत स्थानिकांनी माहिती दिली. ते ANI बरोबर बोलत होते.

पालिकेच्या मुंबई अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३:४८ च्या सुमारास या घटनेची नोंद झाली. चिराग नगर भागातील राठोड मेडिकलजवळ ही दरड कोसळली आणि त्याचा ढिगारा गौशिया चाळीवर पडला. या घटनेनंतर पालिकेचे अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या संशयित रहिवाशांचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथकांकडून सध्या बचावकार्य वेगाने सुरू आहे.

पत्रे तुटून दरड घरात कोसळली

“आम्ही रात्री झोपलो होतो. पण वरून झाड आणि दगडं कोसळली. त्यामुळे पत्रे तुटून ही दरड घरातील माणसांवर कोसळली. आम्ही लगेचच घराबाहेर पडलो आणि मी याबाबत माझ्या बहिणीला सांगायला गेलो. पत्रे तुटून दरड घरात कोसळल्याने अनेकजण जखमी झाल्याची शक्यता आहे. रात्री पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली असावी”, अशी प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली.

तर, या दरडीखाली काही मुलंही अडकली असल्याची भीती काही महिलांनी व्यक्त केली. हे सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले होते. काहीजणांचं संपूर्ण कुटुंब या दरडीखाली अडकलं असून त्यांचं बचावकार्य सुरू आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

“पाऊस सुरू असल्याने अशोक नगर येथे दरड कोसळली असून आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. पोलीसही तैनात करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी अनेक पथके तैनात आहे. चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली.

संरक्षक भिंतींसाठी निधी कमी

“अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे. मुलुंडपासून चांदिवलीपर्यंत जो डोंगर आहे, तो आम्हा पाच-सहा आमदारांच्या मतदारसंघात येतो. डोंगराळ भागातील संरक्षक भिंतीचा प्रश्न आहे. भिंतीसाठी जो निधी आहे, त्याकरता मर्यादा आहेत. जे धोकादायक घरे आहेत, त्यांना शासनस्तरावर स्थलांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. संरक्षक भिंतीच्या निधीची वाढ करण्याची गरज आहे. आपण भिंती बांधतो, पण त्यानंतर भिंतीच्यावर काही अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात, तिथे फसवणूक गोर-गरिबांना या झोपड्या विकल्या जातात. त्यानंतर, त्या अधिकृत केल्या जातात. मग वर पुन्हा भिंत बांधायची. पण संरक्षण भिंती बांधण्याचा क्रम कधीच कमी होत नाही. अनधिकृत झोपड्या बांधताना महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांचा समन्वय नाही. त्यामुळे, अनधिकृत झोपड्या थांबत नाहीत, त्यामुळे संरक्षक भिंती बांधाव्या लागतात, त्याकरता निधी मिळत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.