खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ; ईडीकडून चौकशी सुरुच

पुण्यातील जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाची कारवाई

Eknath Khadse son in law, Eknath khadse NCP leader
गिरीश चौधरी यांना गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यांच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे. आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे आणि चौधरी यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं. आता गुरुवार म्हणजेच १५ जुलैपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा- खडसे यांचे जावई गिरीश चौधरी अटकेत

ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

या घडामोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला होता. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.

आणखी वाचा-जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स

या व्यवहारासाठी खडसे यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केला, असा आरोप त्यांच्यावर आहे. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना खरेदी व्यवहाराच्या नोंदीनुसार गिरीश यांनी तो ३.७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची नोंद आढळते. हा भूखंड इतक्या कमी किमतीस कसा विकत घेतला आणि तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या रकमेचा स्रोत काय, या मुद्दय़ांवर ईडीने तपास सुरू केला. गिरीश यांनी चौकशीदरम्यान काही कंपन्यांकडून कर्ज घेतले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही रक्कम बोगस कंपन्यांद्वारे वळविण्यात आल्याची माहिती तपासातून हाती आल्याचे ईडीने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Girish chaudhri son in law of ncp leader eknath khadse has been remanded further custody by ed vsk

ताज्या बातम्या