राज्यात सध्या सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी डिजेबंदीची मागणी केली आणि त्यानंतर हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला. आता या मुद्यांवर अनेकजण वेगवेगळी मते मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे राज्यातील शाळांच्या दुरावस्थेवरून आवाज उठवत आहेत, तर एकीकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

या सर्व घडामोडींचा विचार केल्यास महाराष्ट्रात सामाजिक मुद्द्यांवर लोकांचा आवाज वाढतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे. या मुद्यांच्या पार्श्वभूमीवरच आज ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टिकोन’मध्ये सविस्तर विश्लेषण करत महत्वाचं भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात.

गिरीश कुबेर यांनी काय म्हटलं?

महाराष्ट्रात सामाजिक मुद्द्यांवर लोकांचा आवाज वाढतोय का? म्हणजे विद्यानंद बापट यांनी एका सभेत डिजेबंदीची मागणी केली आणि त्यानंतर हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला. यावरून तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात मागील काही दिवसांत बदललेल्या गोष्टी आणि त्यानंतर सर्वसामान्य चेहरे चर्चेत येतात आणि त्यांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळतो. हा बदल नेमकं कसा वाटतो? या प्रश्नावर बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, “मला तर हे स्वागतार्ह वाटत आहे. विशेषतः दिल्लीत जंतरमंतवर झालेल्या आंदोलनापासून. याचं कारण असं की हिंदीत एक म्हण आहे की ‘नंगेसे खुदा भी डरता है, म्हणजे ज्यांची नावं झालेली आहेत, ज्यांची एक राजकीय पद्धत तयार झालेली आहे, असे लोक काय करतील याचा अंदाज लोकांना आलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता काही अपेक्षाच नाहीयेत. त्यामुळे आता लोकांना असा एखादा मुद्दा समोर आला की वाटतं की हा मुद्दा महत्वाचा आहे, मग तो मुद्दा कोणी मांडला हे महत्वाचं नाही.”

“ध्वनीप्रदूषणाचा विषय महत्वाचा आहे, मग तो कोणीही मांडलेला का असेना. त्यामुळे आपण या घटनेचं स्वागत करायला हवं. अतिशय महत्वाचा हा विषय आहे आणि असंच व्हायला हवं. कारण खरे मुद्दे या निमित्ताने किमान चर्चेत तरी येत आहेत”, असं मत गिरीश कुबेर यांनी मांडलं आहे.

लोकांचा आवाज का वाढतोय? या बदलाची कारणं काय?

विद्यानंद बापट यांनी डिजेबाबत आवाज उठवल्यानंतर लोक किमान त्या मुद्यांवर व्यक्त तरी होत आहेत. मग हा जो बदल आहे, या बदलाची कारणं काय आहेत? की हा मुद्दा वेगळा आहे, या प्रश्नावर बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, “आता हा मुद्दा प्रत्येकाच्या घरापर्यंत यायला लागला आहे. प्रत्येकाच्या घरी मुलाला किंवा मुलीला ध्वनीप्रदूषणाचा त्रास व्हायला लागलेला आहे. कारण एखादा कोणतातरी राजकारणी रस्त्यावर मंडप उभा करतो आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होता, हे लोकांना आता जाणवायला लागलं. त्यामुळे लोकांना हे वाटायला लागलं की जर आपण आता उभे राहिलो नाही तर हे आपल्या थेट घरांपर्यंत येईल. त्यामुळे लोकांना वाटतं की अशा मुद्यांना आपण होऊन पाठिंबा दिला पाहिजे. यामध्ये सध्याच्या सामाजिक मांडणीची जी एक विभागणी आहे, ती मांडणी आपण लक्षात घेतली तर यामध्ये ‘बापटांचा बापट’ असणं खूप महत्वाचं आहे. मग हे देखील बापटच आहेत, आणि तेही रत्नागिरीहून आलेले. त्यामुळे त्याला एक वेगळी धार येते. ती धार असल्यामुळे हा विषय जास्त प्रमाणात पसरला हे खूप चांगलं झालं”, असं मत गिरीश कुबेर यांनी मांडलं आहे.