Girish Kuber analysis NEET protest Delhi: “कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान, आंदोलकांना सरकारने दिलेली वागणूक नक्कीच चुकीची होती, यापूर्वी केवळ शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराबद्दल बोलले जात होते, आजच्या प्रकारामुळे गृहखात्याच्या ढिसाळ कारभाराबाबतही बोलले जाईल”, असे विश्लेषण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या कार्यक्रमात बोलताना केले. “सरकारने हे आंदोलन एवढे ताणायला नको होते, चर्चा करायला हवी होती, आंदोलन होऊ न देण्यातच शहाणपण होतं, त्याकडे दुर्लेक्ष करणे महाग पडले”, असेही कुबेर म्हणाले.
गृहखात्याचे अपयश
“सरकारसाठी आंदोलनाचा आकार महत्वाचा असतो, एवढ्या दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनाची सरकारने शक्य तेवढी उपेक्षा केली. यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्यातील ढिसाळ कारभाराबाबत चर्चा केली जात होती, आजच्या आंदोलनानंतर आता गृहखात्याच्या ढिसाळ कारभाराबाबत चर्चा केली जाईल. मोठ्या संख्येने तरुण दिल्लीत दाखल झाले आणि आता संसदेवर धडकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सुरक्षा रक्षकांशी संसदेचे फाटक बंद केली, हे गृहखात्याच्या अपयशाचे उदाहरण आहे”, असे गिरीश कुबेर म्हणाले.
आंदोलन म्हणजे देवाणघेवाण – कुबेर
“आर्थिकदृष्ट्या आपण मागे पडत आहोत, रोजगार निर्मिती होत नाहीये, तरुणांना देण्यासारखं काही नाही तसेच, उच्चशिक्षित मुलं कोणत्या पातळीवर अस्वस्थ आहेत याची दखल सरकारने घेतलेली नाही. आपणच नरेटीव्ह सेट करु शकतो हा सरकारचा दंभ होता याला आज तडा देण्यात आला याचं लोकशाही प्रेमींनी स्वागत करायला हवं”, असे विश्लेषण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. “कोणत्याही आंदोलनात चार मागण्या केल्या तर एखादी सोडावी लागते, कारण ही देवाणघेवाण असते”, असे कुबेर म्हणाले.
प्रधान यांचा राजीनामा होणार का?
“सरकार १०० टक्के चूक आहे पण, काही प्रमाणात आंदोलनात देखील चुका झाल्या. अशा प्रकारे राजीनामा घेतल्यामुळे वेगळा संदेश जातो. एवढ्या सहज राजीनामा होत नाही”, असे कुबेर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना म्हणाले. “सरकारने उदार अंत:करणाने वागायला हवं होतं, आंदोलन होऊ न देण्यातच शहाणपण होतं, त्याकडे दुर्लेक्ष केलं आणि तेच महाग पडलं. समाज माध्यमांवरील वादळाचे जमिनीवरील वादळात रुपांतर कसं होऊ शकतं हे या आंदोलनातून दिसलं हे आंदोलनाचे एक प्रकारचे यशच आहे”, असे कुबेर म्हणाले.
आंदोलनात विरोधक का नव्हते?
आंदोलक विरोधकांना बरोबर घेण्यात संवाद साधण्यात अपयशी ठरल्याचेही कुबेर म्हणाले. आंदोलन आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या भवितव्याबाबत बोलताना कुबेरांनी २०११ सालीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दाखला दिला. “अण्णांच्या आंदोलनाने काही साध्य होणार नाही अशी टोकाची भूमिका त्यावेळी लोकसत्ताने घेतली यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली पण, अंतिमत: तेच खरे ठरले. व्यवस्थेत येऊन चर्चा करावी लागते, आंदोलन म्हणजे कुकरची शिट्टी नाही, ही दिर्घकालिन प्रक्रिया आहे”, असे मत कुबेरांनी नोंदवले. “सरकारने आंदोलन एवढं ताणायला नको होतं. सरकारने निदान जाऊन चर्चा करायला हवी होती, आज झालेली घटना नक्कीच चुकीची होती”, असे कुबेर म्हणाले.
