गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपा आणि शिंदे सेनेच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असल्याने युतीतील मतभेद चर्चेत आलेले आहेत. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर गणितं कशी बदलली आहेत? तसेच सध्या विरोधक व सत्ताधारी मोर्चे का काढत आहेत? या सर्व घडामोडींवर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टिकोन’मध्ये सविस्तर विश्लेषण करत महत्वाचं भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय मत मांडलं आहे? याबाबत जाणून घेऊयात.

गिरीश कुबेर यांनी काय म्हटलं?

गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असणारे तीन पक्ष हे भांडताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींबाबत एक कथित ऑडिओ क्लिप समोर आणली आणि त्यानंतर भाजपा व शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. त्यानंतर विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर भाजपा आणि शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल आहे का? काय वाटतं? याबाबत बोलताना गिरीश कुबेर यांनी म्हटलं की, “अतिशय टोकाच्या विरोधाभासाने भरलेलं हे युतीचं सरकार आहे. आतापर्यंत युती आणि आघाड्या झालेल्या नाहीत असं नाहीये. पण आता महायुतीमधील एकमेकांच्या विरोधातील मतभेदाचं जे संचित आहे ते बाहेर यायला लागलेलं आहे.”

‘भाजपाला दोन पक्षांचं ओझं जड झालंय’

“भाजपाच्या लोकांना आता या दोन पक्षाचं (शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) ओझं जड झालेलं आहे, हे आता दिसून आलेलं आहे आणि हे भाजपाच्याच लोकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आता मतभेद बाहेर यायला सुरूवात झालेली आहे असं म्हणता येईल”, असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

पदवीधरांना महायुतीबाबत राग आहे का?

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाचा विचार केल्यास पदवीधरांना महायुतीबाबत राग आहे का? काय वाटतं? या प्रश्नावर बोलताना गिरीश कुबेर म्हणाले की, “पदवीधरांमध्ये नाराजी आहेच. याबाबत तुम्हाला किंवा आम्हाला काय वाटतं यात जायला नको. मात्र, नागपूरमध्ये पहिल्या फेरीसाठी ७५ हजार मते मिळणं गरजेचं होतं. त्यामध्ये भाजपाच्या उमेदवाराला ६१ हजार मते मिळाले, म्हणजे याचा अर्थ असा की जी निवडणूक आम्ही पहिल्या फेरीतच जिंकू, तेवढी किमान मते देखील त्यांना मिळाले नाही. यातील अनेकांनी भाजपाच्या उमेदवारासमोर २ आकडा लिहिला होता, म्हणजे हा उमेदवार पहिल्या पसंतीचा म्हणून आम्हाला मान्यच नाहीये. यातील दुसरा मुद्दा म्हणजे एवढे सारे मतदार हे भाजपानेच नोंदवले होते. पण तरीही ७५ हजार मते भाजपाला पहिल्या फेरीत मिळाले नाहीत”, असंही गिरीश कुबेर म्हणाले.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपाला दिलेला हा इशारा असू शकतो’

“आता जेव्हा हे पदवीधर मतदार भाजपाकडून नोंदवले जातात, तेव्हा त्यांचा संघाशी थोडासा तरी संबंध आलेला असतो. तसेच नागपूरच्या पदवीधर मतदारसंघाला एक उज्ज्वल परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील हे त्या पदवीधर मतदार संघामधून निवडून आलेले आहेत. पण आता मात्र तोच भाजपा त्या पदवीधरांना नकोसा झालेला आहे. याचा अर्थ एकच असू शकतो की एकतर भाजपाने चुकीचे पदवीधर मतदार नोंदवले किंवा पदवीधरांना भाजपाचा तिटकारा आलेला आहे. यातील तिसरा इशारा असा की यामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपाला दिलेला इशारा असू शकतो. कारण नागपूरमध्ये भाजपाला हरवणं कसं शक्य आहे? मला असं वाटतं की जे दिसतं त्यापेक्षा यामागे बरंच काही आहे”, असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.