जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन काहीजण नाचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आता या विषयावर ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “गणेश विसर्जन मिरवणुकीत नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचणे समर्थनीय नाही, असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.
गिरीश महाजन म्हणाले, “गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेंचा फोटो घेऊन नाचणे समर्थनीय नाही. त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. याबाबत मला माहिती नाही. मी मुंबईला होतो, आजच जळगाव जिल्ह्यात आलो आहे. असं झालं असेल तर निश्चित चौकशी केली जाईल.”
“आदूबाळाने या सरकारला सळो की पळो करून सोडलं”
“आदूबाळाने या सरकारला सळो की पळो करून सोडलं”, असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी सरकारला सळो की पळो करून सोडलं असं त्यांना वाटतं का. या सगळ्या बाळलाडामुळेच उद्धव ठाकरेंवर हे दिवस आले आहेत. आपल्या बाळ्याला सांभाळता सांभाळता उद्धव ठाकरेंना सर्व लोक सोडून गेले. हे सर्व सोडून जाण्याला हे आदू बाळच कारणीभूत आहे, असं मला वाटतं.”
हेही वाचा : “ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
“तर आदित्य ठाकरेंनी स्वतःचं कौतुक करून घ्यावं”
“आदित्य ठाकरेंमुळेच ४३ आमदार-खासदार सोडून गेले. त्यांच्याकडे राहिलं काय? असं असूनही त्यांना स्वतःचंच कौतुक असेल, तर त्यांनी ते कौतुक करून घ्यावं. म्हणजे राहिलेलं सगळं पुसलं जाईल,” असं म्हणत गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.