मुंबई : एकनाथ खडसे यांची तब्बेत बरी नसल्याने आणि ते सभागृहात येऊ शकत नसताना रोज लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न टाकत आहेत. सभागृहात कधीच उपस्थित राहू शकत नाही, मग घरी बसून कशाला ते पाठवतात, त्यांचा नेमका हेतू काय आहे, असे सवाल करत त्यांना लोकांना ब्लॅकमेल करायचे आहे काय, असा संताप मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवीला विधान परिषद सभागृहात हजेरी लावली. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते सध्या सभागृहात उपस्थित राहत नाही. असे असले तरी खडसे हे लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न मांडत आहेत.

मंगळवारी विधान परिषदेत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील सुनसगाव परिसरातील शेतीसाठी वाघूर धरणाचे पाणी सोडण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तर देणार होते. मात्र खडसे उपस्थित नसताना त्यांच्या ऐवजी त्यांच्या पक्षाचे नेते, आमदार शशिकांत शिंदे हे प्रश्न विचारण्यास उभे राहताच मंत्री महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. ते रुग्णालयात आहे असे कळले. पण अधिवेशन सुरू झाल्यापासून खडसे यांच्या लक्षवेधी, त्यांचे तारांकीत प्रश्न दररोज येत आहेत, पण ते सभागृहात येतच नसतील, तर घरी बसू कशाला प्रश्न टाकतात? स्वत: घरी बसायचे आणि माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही बोलवतो.

सगळे अधिकारी काम-धंदा सोडून इथे येतात, माहिती देतात आणि ते एकही दिवस इथे येत नाहीत, असा मुद्दा उपस्थित करत हे सर्व कशासाठी चालले आहे. यामागचा हेतू काय? तुम्हाला लोकांना मुद्दाम ब्लॅकमेल करायचे आहे का, असा संताप महाजन यांनी व्यक्त केला. दरम्यान, सभापती राम शिंदे यांनी सभागृहाच्या बाहेरचे प्रश्न इथे मांडू नका असे म्हणत गिरीश महाजन यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

खडसेंवर जादूटोणा केला का?

यावर स्पष्टीकरण देताना शशिकांत शिंदे यांनी खडसेंचा आपल्याला फोन आला असल्याचे सांगितले. त्यांची तब्येत बरी नाही आणि त्यांना अशक्तपणा आहे. काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला का, ते का आजारी पडले, याचा आम्ही शोध लावतोय, असा टोला त्यांनी लगावला.

अधिवेशनाच्या काळात खडसे यांनी अडचणीचे प्रश्न विचारल्याने काही लोक अडचणीत येऊ शकत असल्याने नाशिकच्या खरात बाबांकडे जाऊन त्यांनी जादूटोणा केला का, याचा शोध आता एसआयटी करते आहे. त्यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज देणार आहे, असे म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला. खडसे यांनी राजकारणात अनेकांना बनवले आणि घडवले तरीसुद्धा त्यांच्या तब्बेतीबाबत संशय व्यक्त करणे दुर्दैवी असल्याचे शिंदे म्हणाले.