Girish Mahajan On Nashik BJP AB Form Drama : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांची धावपळ सुरू आहे, तर अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना पक्षाने तिकीट नाकारल्याने पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
यावरूनच नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. इच्छुक उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म मिळण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत झालेला प्रकार अतिशय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही गिरीश महाजन यांनी दिला आहे.
गिरीश महाजन काय म्हणाले?
“जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कारण या ठिकाणी जागा फक्त १२२ आहेत आणि आमच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या एक हजारांच्या आसपास होती. त्यातच आज एबी फॉर्म देण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. मात्र, अनेकांना वाटलं की आपल्यालाच तिकीट मिळालं पाहिजे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. आता सर्वांनाच वाटतं की आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. पण जागा कमी आहेत आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने असा गोंधळ झाला”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
“आता जर आमच्या पक्षाचे पदाधिकारी हे एबी फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेकांना ते एबी फॉर्म देताच आले नसते आणि एबी फॉर्म देण्याचं राहून गेलं असतं. त्यामुळे त्यांनी ते एबी फॉर्म गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे गेले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.
‘हा प्रकार अतिशय चुकीचाच’
“खरं तर झालेला हा प्रकार अतिशय चुकीचाच आहे. एबी फॉर्म देत असताना कोणीतरी १०० ते १५० लोक येतात आणि पाठलाग करतात. मारामारी करतात, हे अतिशय अयोग्य आहे. या सर्व प्रकाराची चौकशी देखील केली जाईल. या पाठलाग करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोण खत पाणी घालत होतं? यामध्ये कोणते प्रमुख कार्यकर्ते होते याची आम्ही चौकशी करून कारवाई करणार आहोत. तसेच झालेला हा प्रकार मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
